देवेश गोंडाणे, लोकसत्ता
नागपूर: आधी कोंबडी की आधी अंड इथपासून ते अंड शाकाहारी की मांसाहारी या चर्चेला अखेर अंत करणारा दावा पशुवैद्यकानी केला आहे. बाजारात येणाऱ्या कोंबडी या पक्ष जातीपासून येणाऱ्या अंड्यांमध्ये जीव नसल्याने त्यांना मांसाहारी म्हणताच येणार नाही असा दावा करण्यात आला आहे. शाकाहार आणि मांसाहाराची संकल्पना ही जीव आणि निरजीवशी जोडली गेली आहे. त्यामुळे जीव हत्येला विरोध असतो. ज्या प्राण्यात किंवा पक्षात जीव आहे त्याला आपण मांसाहारामध्ये मोडतो. मात्र अंड्यामध्ये जीवच नसेल तर त्याला मांसाहारी कुठल्या आधारावर म्हणणार असा दावा पशुवैद्यकानी केला आहे.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुक्कुटपालन संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख डॉ. मुकुंद कदम यांनी सांगितले की, कुठल्याही नर कोंबड्याशी संपर्क न येताही कोंबडी अंडे देते. त्यामुळे अंडी देने ही प्रत्येक पक्षाची म्हणजे कोंबडीची नैसर्गिक कृती आहे. एखाद्या झाडाला जसे फळ येते तसाच हा प्रकार आहे.
हेही वाचा… नागपूर: उपराजधानीच्या ग्रामीण भागात शिक्षणाचा खेळखंडोबा, ७८ शाळांमध्ये एकही शिक्षक नाही
लेगहान जातीच्या कोंबड्या या वर्षाला ३२० पेक्षा अंडी देतात. या कोंबडीच्या अंड्यांमध्ये जीव नसतो. बाजारात कुक्कुटपालन केंद्रातून अंडी येतात. येथे नर कोंबडा राहतच नाही. त्यामुळे या मादी कोंबड्यांचा नर कोंबड्यांशी संपर्क येण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे ही अंडी शंभर टक्के शाकाहारी आहेत असे म्हणता येईल.