वर्धा : केवळ पैशांसाठी माझी बदनामी केल्या जात असून वाईट कृत्यांना आळा घालने मला भोवले, असे मत कुलगुरू रजनीशकुमार शुक्ल यांनी व्यक्त केले.
येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील वातावरण विविध आरोप प्रत्याराेपांनी ढवळून निघाले असून कुलगुरू शुक्ल हे केंद्रस्थानी आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी विद्यापीठात पत्नी व मुलांसह पत्रकार परिषद घेतली. या वेळी बोलताना ते म्हणाले की, माझी प्रतिमा मलीन करून विद्यापीठातून बाहेर काढण्यासाठी सर्व प्रकार सुरू आहे.
महिलेचे शोषणाचे आरोप, समाज माध्यमांवर बदनामीकारक पोस्ट, वेगवेगळे आंदोलने याद्वारे मला लक्ष्य केल्या जात आहे. काही समाजकंटकांकडून होत असलेल्या या प्रकारामुळे माझे व माझ्या कुटुंबीयांचे जीवन अडचणीत आले आहे. गत दोन महिन्यांपासून हे प्रकार सुरू आहे.
हेही वाचा – नागपूर: खेळता खेळता चिमुकला पाण्याच्या बँकेटमध्ये पडला अन्…..
१ जून रोजी महिलेचे शोषण केल्याचा आरोप करीत माझ्या चारित्र्यावर आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर २५ दिवस या विषयीची चर्चाही कुठे झाली नाही. याच दरम्यान २६ जून रोजी दिल्ली येथे विद्यापीठातील वित्त समितीची बैठक होती. या बैठकीसाठी मी दिल्लीला गेलो. प्रवासामुळे माझी प्रकृती बिघडली. त्यामुळे मी रुग्णालयात भरती झालो. मात्र, मी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त पसरविण्यात आले. आत्महत्या करणारा व्यक्ती स्वत: रुग्णालयात चालून जातो का, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
या घटनांमुळे माझ्या कुटुंबीयांमध्ये मोठ्या तणावाचे वातावरण आहे. एका महिलेने सन २०२१ पासून आतापर्यंत सात वेळा मुलाखत दिली. मात्र, पहिल्या फेरीतच गुणवत्तेनुसार तिला बाद करण्यात आले. मात्र, आता तिच्याकडून शोषण केल्याचा आरोप करीत विद्यापीठात नियुक्ती आणि पैशांसाठी ब्लॅकमेलिंग केल्या जात आहे. एवढेच नाही तर माझा मुलगा आणि मुलीलाही पैशांसाठी फोन करून मानसिक त्रास दिल्या जात आहे. त्या महिलेने नियुक्तीसाठी प्रलोभन देत काही व्हॉट्सअॅप चॅटदेखील व्हायरल केले.
२४ जुलै रोजी याच महिलेने पुस्तक विमोचनासाठी निमंत्रित केले आणि त्याच रात्री माझ्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्याचप्रमाणे स्वत:चे बँक डिटेल्सही पाठवून ‘राम की पुजा में क्या-क्या अर्पित कर रहे हो…’ असा संदेशही व्हॉट्सअॅपवर पाठविला. त्यामुळे तात्काळ मी राष्ट्रपतींकडे याबाबतची ई-मेलद्बारे तक्रार नोंदविली होती, असेही कुलगुरू म्हणाले.
आधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ हे दिल्ली स्तरावरून चालविले जात होते. त्यावेळी याच विद्यापीठात नक्षलवादी गतिविधी सुरू होत्या. अनेकदा इंटेलिजन्स ब्युरोने धाडी टाकून कारवाई केल्यात. यात अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले होते. मात्र, चार वर्षांपूर्वी या विद्यापीठात कुलगुरू म्हणून माझी नियुक्ती झाली आणि या सर्व गोष्टींवर आळा बसला. शिक्षणासह अन्य उपक्रम राबविण्यासाठी मी दिवसरात्र परिश्रम घेतले. त्यामुळेच आज या विद्यापीठाचे देश-विदेशात नाव आहे.
हेही वाचा – आज मध्यरात्री आकाशात उल्का वर्षाचा प्रकाश उत्सव, खगोलप्रेमींसाठी पर्वणी
मात्र, काही समाजघातकींना हा बदल नकोसा झाला आहे. एकीकडे लैंगिक शोषणाचे आरोप आणि विद्यापीठात चालविलेले आंदोलन यामुळे आमच्या आयुष्यात मोठा तणाव निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वी माझ्या वाहनावर एका गटाने आक्रमण केले. मात्र, काही शिक्षकांच्या मदतीने मी या हल्ल्यातून बचावल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या सर्व प्रकरणाची २२ जुलै रोजी सायबर तर २८ जुलै रोजी रामनगर पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, सत्य बाहेर येण्याआधीच माझी प्रतिमा मलीन करून विद्यापीठातून बाहेर काढण्याचा प्रकारही सुरू करण्यात आला आहे. त्या तथाकथित महिलेने शोषणाचे आरोप करीत पैशांसाठी ब्लॅकमेलिंग, विद्यापीठात नियुक्तीची मागणी केली आहे. यासाठी समाज माध्यमांवर माझी बदनामीही सुरू केल्याने माझे कुटुंब पूर्णत: तणावात आले असल्याचे सांगून शुक्ल यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.