नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने संपूर्ण जगात सर्वोच्च प्रतिष्ठा प्राप्त केली आहे. आज आपण अमेरिकेसारख्या विकसित देशाच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत. आपली लोकशाही मूल्ये जगात श्रेष्ठ आहेत. मात्र, असे असतानाही काही लोक आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची चांगली प्रतिमा मलीन करण्याचे काम करत आहेत, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी उपराष्ट्रपती म्हणाले, भारत हा गुंतवणुकीसाठी जगात सर्वात उत्तम देश आहे. मात्र, काही लोक हे देशाविषयी नकारात्मक प्रचार करीत आहेत. संविधानिक संस्थांना बदनाम करणाऱ्या अशा विचारांना आम्ही सहन करणार नाही. आपल्या देशाची संसद आणि विधिमंडळ ही लोकशाहीची केंद्रे आहेत. जिथे लोकप्रतिनिधींनी चर्चा करून देशाला पुढे न्यायला हवे. पण दुर्दैवाने सभागृहात दररोज गदारोळ बघायला मिळतो. आपल्या लोकप्रतिनिधींनी संविधान सभेकडून शिकले पाहिजे. ज्यांनी जवळपास ३ वर्षे विविध वर्ग आणि विचारसरणीच्या लोकांसोबत एकत्र काम केले. पण कधीही अनावश्यक वादविवाद किंवा गदारोळ केला नाही. लोकप्रतिनिधींनी लक्षात ठेवावे की संसद किंवा विधिमंडळ जनतेच्या पैशाने चालवले जाते. त्यात कृतिशील कार्य होणे आपल्या लोकप्रतिनिधींचे घटनात्मक कर्तव्य आहे.
हेही वाचा – दुहेरी हत्याकांडातील आरोपीने १११ बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून लुबाडले
हेही वाचा – अमरावती विमानतळासाठी केंद्र सरकारचीही ‘उडवाउडवी’! पंधरा वर्षांपासून कामे रखडली
नवीन शैक्षणिक धोरणाच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकताना धनखड म्हणाले की, कौशल्य विकासावर आधारित नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. त्याचे फायदे आधीच दिसत आहेत. पण तरीही काही राज्यांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही. हे धोरण लवकरात लवकर लागू करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी केले. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू संजय दुधे उपस्थित होते.