संजय मोहिते, लोकसत्ता
बुलढाणा : बुलढाणा मतदार संघात येत्या २६ एप्रिलला मतदान होणार असल्याने प्रचार अंतिम टप्यात आला आहे़. अंतिम टप्प्यात महायुतीने प्रचार सभांचा धडाका लावला असून आघाडीचा थेट संपर्कावर भर आहे. दुसरीकडे स्वतःच स्टार प्रचारक असलेल्या अपक्षांनी ‘रोड शो’ वर भर दिला असून त्याला मिळणारा प्रतिसाद अनपेक्षित आहे. त्यामुळे दोन प्रमुख अपक्षांमुळे होणारे मतविभाजन हा निकालात महत्वाचा घटक ठरणार आहे.
नियोजनामुळे महायुतीचे प्रतापराव जाधव अंतिम टप्प्यातही आघाडी टिकवून आहे. शेवटच्या टप्प्यात त्यांनी स्टार प्रचारकांच्या सभावर जोर लावला आहे. या सभा विचारपूर्वक, सामाजिक समीकरणे व मतदानावाढीला पूरक ठरतील अश्या आहेत. अगदी प्रचाराच्या अंतिम मुदतीतही २४ ला चिखली येथे नितीन गडकरी यांची सभा लावण्यात आली आहे. २१ ला भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची सभा पार पडली. कार्यकर्त्यांतील जोश टिकविण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील व लेवा समाजाची मते डोळ्यासमोर ठेवून खासदार रक्षा खडसे यांना आवर्जून पाचारण करण्यात आले.
आणखी वाचा-खासदार संजयसिंग म्हणतात, ‘भाजपला निरोप देण्याची वेळ’
आज मुस्लिम व मराठा बहुल धाड पट्ट्यात रावसाहेब दानवे, अब्दुल सत्तार या मंत्र्यांच्या सभा लावण्यात आल्या. चिखलीत अभिनेता गोविंदा यांचा रोड शो आज २२ तारखेला पार पडला. लक्षणीय संख्येतील वंजारी समाजाची मते लक्षात घेत पंकजा मुंडे यांची उद्या २३ ला दुसरबीड (ता.सिंदखेडराजा) येथे सभा लावण्यात आली आहे. प्रचाराच्या धडाडणाऱ्या तोफा शांत होण्यापूर्वी २४ ला केंद्रीयमंत्री गडकरी यांची सभा आहे. युवा आणि कुंपणावरील मतदारांसाठी ही सभा महत्वाची ठरणार आहे.
या सभामुळे मतदारसंघामधील वातावरण ढवळून निघणार आहे. याला वैयक्तिक प्रचार, कॉर्नर बैठका, युतीच्या सहा आमदारांनी विधानसभा क्षेत्रावर केलेला ‘फोकस’ याची जोड आहे. मतदानाचे नियोजनावर प्रामुख्याने भाजपचा जोर आहे. यात जाधवांनी स्वतः लक्ष घातले आहे. ठाकरे व वासनिकांच्या सभा पूरक दरम्यान २१ तारखेला खामगावात पार पडलेल्या उद्धव ठाकरे व काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांच्या संयुक्त सभेने उबाठा सह आघाडीला बळ मिळाले. त्याअगोदर बुलढाण्यात घेतलेल्या काँग्रेस मेळाव्यात वासनिकांनी सर्व गटांच्या कानपिचक्या घेत कामाला लावले. त्यामुळे आघाडीचे नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचाराला गती आली आहे. शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यात आहे. त्यांच्यासह उद्धव ठाकरेंबद्धल असलेली सहानुभूती, चार लाखांच्या आसपास असलेल्या दलित मुस्लिम समाजाचे पाठबळ यामुळे खेडेकर अंतिम शर्यतीत आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
आणखी वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदी पराभवाच्या भीतीने बावचळले, खासदार संजय सिंह यांचा आरोप
मागील २०१९ च्या लढतीत १ लाख ७२ हजार मतदान घेऊन उलटफेर करणाऱ्या वंचितचा यंदा कमी प्रभाव असल्याचे दिसून येत आहे. चिखलीत प्रकाश आंबेडकरांच्या सभेला मिळालेला थंड प्रतिसाद ही बाब सिद्ध करणारी ठरली आहे. वंचित मधील एक प्रभावी गट प्रचारापासून अलिप्त आहे. यामुळे उमेदवार वसंत मगर यांचे मतदान अपेक्षेपेक्षा कमी राहणार आहे. हे अल्प मतविभाजन आघाडीला दिलासा ठरणार आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यामुळे यंदाची लढत तिरंगी ठरली आहे. अंतिम टप्प्यातही त्यांच्या प्रचाराचा ‘टेम्पो’ कायम आहे. कालपरवा भाजप व काँग्रेसचा गड असलेल्या खामगाव आणि महायुतीचे प्राबल्य असलेल्या जळगाव, मेहकर, सिंदखेडराजा, शेगाव येथील त्यांच्या रोड शो ला जमलेली गर्दी बुचकळ्यात पाडणारी ठरावी. आज सोमवारी चिखलीत पार पडलेल्या रोड शो मध्ये हेच चित्र दिसून आले. विकासाच्या मुद्यावर निवडणुकीत मैदानात उतरलेले वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांच्याही सभा, कॉर्नर बैठका व रोड शो ना भेटणारा प्रतिसाद अनपेक्षित आहे. त्यामुळे या दोन्ही अपक्षांना मिळणारे मतदान, त्यामुळे होणारे मतविभाजन निकालात महत्वाचा घटक ठरणार हे नक्की.
आणखी वाचा-नागपुरात उन्हाळ्यात पाऊस, ‘हे’ आजार वाढण्याचा धोका..
‘सोशल मीडिया अन् व्हिडीओ वॉर’
यंदाच्या प्रचारात समाज माध्यमाची महत्वाची भूमिका राहिली आहे. स्वबळावर व कोणत्याही स्टार प्रचारक शिवाय लढणाऱ्या तुपकर, शेळके यांचा यावर भर आहे. असंख्य व्हाट्सएप समूह, इन्स्टाग्राम, फेसबुक, त्यावरील फॅन्सपेज, रिल्स आणि मिंम्स चा मुक्त वापर होतोय. काही बैठकांना जाणे अशक्य झाल्यावर अपक्ष शेळके यांनी थेट ‘ व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’ द्वारे संबोधने हा याचा कळस ठरावा. दुसरीकडे मतदार संघात ‘व्हिडीओ वॉर सुद्धा रंगले असून जुन्या वादग्रस्त व्हिडीओ उकरून काढत त्याचा (अप) प्रचारासाठी वापर करण्यात येत आहे.
जाधवांच्या सभाच्या कमी गर्दीचे, खेडेकर यांच्या बाबरी मस्जिद व कारसेवा वरील जुन्या वक्तव्याचे, तुपकरांचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतचे, सावकार गाडे संदर्भातील प्रसारित झालेले व्हीडिओ व त्याच्या खुलासा करणारे व्हिडीओ असा खेळ रंगला आहे. राजकीय अफवांना उत आले आणण्यात आला आहे. पाना या बहुचर्चित चिन्हामुळे तुपकर हे निवडून आल्यावर भाजपात जाणार, शेळके यांचे एका प्रमुख उमेदवाराला समर्थन, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांची सभा देण्यास नकार, वंचित च्या नाराज गटाने मुकुल वासनिकांची भेट घेतली, ही अफवा समाज माध्यमांवरील युद्धांची उदाहरणे ठरावी.