नागपूर: उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड मीटरच्या विरोधातील आंदोलन आता आक्रमक होतांना दिसत आहे. बुधवारी व्हेरायटी चौकात विदर्भवाद्यांनी स्मार्ट प्रीपेड मीटरला कडाडून विरोध करत ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळल्याने तणाव निर्माण झाला होता.
जय विदर्भ पार्टीच्या बॅनरखाली झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व नरेश निमजे आणि मुकेश मासुरकर यांनी केले. स्मार्ट प्रीपेड मीटरला जय विदर्भ पार्टीचा विरोध आहे. दरम्यान शहरातील विविध भागात आधीपासूनच स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर विरोधी नागरिक संघर्ष समितीकडूनही सभा व निदर्शनातून स्मार्ट प्रीपेड मीटरला विरोध होत आहे. बुधवारी दुपारी १ वाजता जय विदर्भ पार्टीचे कार्यकर्ते व्हेरायटी चौकातील गांधी पुतळ्याजवळ गोळा झाले.
हेही वाचा : बेरोजगारांनो सावधान! नोकरीचे आमिष दाखवून फसवणारी टोळी पुन्हा सक्रिय
कार्यकर्त्यांनी स्मार्ट प्रीपेड मीटरसह सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. कार्यकर्ते उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळाही सोबत घेऊन आले होते. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी अचानक रस्त्यावरच फडणवीसांचा पुतळा जाळला. त्यानंतर या पुतळ्याला जोडे- चपलांनी मारले जात असतांना पोलिसांनी आंदोलकांना अडवले. परंतु कार्यकर्ते एकायला तयार नव्हते. शेवटी पोलिसांनी १५ ते १६ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलीस- कार्यकर्त्यांमध्ये छकला- छकलीही झाली. या सर्व आंदोलकांना सिताबर्डी पोलीस ठाण्यात आणले गेले. येथे आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू होती. दरम्यान फडणवीसांचा पुतळा जाळल्यावर परिसरात तनाव निर्माण झाला होता. परंतु अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनीही येथे बंदोबस्त लावला होता. आंदोलनात राजेंद्र सतई, रविंद्र भामोड यांच्यासह पार्टीचे काही कार्यकर्त्यांसह स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर विरोधी नागरिक संघर्ष समितीचेही काही कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हेही वाचा : बुलढाण्यात वादळाचे तांडव; घरावरील टिनपत्रासह पाळणा उडाला, चिमुकलीचा करुण अंत
ऊर्जामंत्र्यांची मनमानी चालणार नाही
व्हेरायटी चौकात स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यामुळे आंदोलक संतापले. आंदोलकांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनमानी पद्धतीने अदानी सारख्या उद्योजकांच्या फायद्यासाठी स्मार्ट प्रीपेड मीटर योजना आणल्याचा आरोप करत ही योजना रद्द न झाल्यास आंदोलन आणखी तिव्र करण्याचा इशारा यावेळी दिला. ही योजना विदर्भात कार्यान्वित होऊ दिली जाणार नसल्याचेही आंदोलक म्हणाले.
मीटरला विरोध कशाला?
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार अदानी, एनसीसी, माॅन्टेकार्लोसह इतर भांडवलदारांच्या फायद्यासाठी ही योजना आहे. ही योजना विद्युत क्षेत्राची खाजगीकरणाकडील वाटचाल आहे. या योजनेमुळे महावितरणमधील लेखा व देयक विभागातील २० हजार कामगार बेरोजगार होतील. ग्राहकांची चूक नसताना मीटर बंद पडणे, जळणे यासारखे प्रकार झाल्यास उपाय काय, याचे उत्तर महावितरणकडे नाही. मीटर्समुळे गळती थोडीशी कमी होईल, परंतु मीटर छेडछाड, वीजचोरी कमी कशी होणार याचे उत्तर नाही. याही मीटर्समध्ये छेडछाड व वीजचोरी होऊ शकते. योजनेमुळे आज चालू स्थितीतील अंदाजे २.२५ ते २.५० कोटी मीटर्स भंगारात टाकले जाईल. या मीटरचा वापर काय, त्यांच्या आधी केलेल्या गुंतवणीकीचे काय, याचेही उत्तर नाही.