वर्धा : शनिवारी ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पण मुख्य वक्ता छगन भुजबळ आलेच नाही. कारण जनतेने पूर्ण पाठ फिरविली होती. याचे खापर समता परिषदेचे विदर्भ संयोजक प्रा. दिवाकर गमे यांच्यावर फोडल्या जात आहे. अन्य काही आयोजक म्हणतात की या मेळावा आयोजनासाठी मोठा निधी आला होता. पण तो काहींनी लाटला.खर्च केलाच नाही.
हेही वाचा – शहरी भागातही पाणी टंचाईची चिन्हे! सव्वा कोटीचा आराखडा
या संदर्भात लोकसत्ता ऑनलाईन सोबत बोलताना गमे म्हणाले की, मला एक रुपया पण आला नाही. पाच कोटी रुपये मिळाल्याचा आरोप खोटा आहे. मंडप, खुर्च्या व अन्य व्यवस्था भुजबळ साहेब यांच्या चमूनेच स्वतः केली. मी आयोजनात नवखा. अनुभव नाही. आम्हीच कुठेतरी कमी पडलो, हे मान्य करावे लागेल. गाड्यांची व्यवस्था झाली नाही. अन्य अडचणी आल्या. तसेच हा मुद्दा विदर्भात चालणार का, याचा विचार कुणी केला का, हा प्रश्न आहेच. पण झाले ते समर्थनीय नाहीच. मी एक रुपया पण घेतला नाही. सिद्ध झाल्यास सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईल, असे प्रा. गमे यांनी निक्षून सांगितले.