नागपूर : अलिकडे रणजी क्रिकेट स्पर्धेत दोनदा विजेतेपद भूषविणाऱ्या आणि आपल्या उत्तुंग कामगिरीतून समस्त क्रिकेट जगताचे लक्ष वेधणाऱ्या विदर्भ क्रिकेट संघात सध्या खेळाडूंची गळती बघायला मिळत आहे. काही महिन्यांच्या कालावधीत विदर्भ क्रिकेट संघातून तीन वरिष्ठ खेळाडूंनी माघार घेतली असून आणखी काही खेळाडू या मार्गावर असल्याचे सांगितले जात आहे. विदर्भ क्रिकेट संघातील स्टार खेळाडू आदित्य सरवटे, फलंदाज मोहित काळे आणि गोलंदाज रजनीश गुरबानी यांनी विदर्भाच्या संघाला सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
सूत्रांनुसार, येत्या काळात आणखी दोन खेळाडू विदर्भाचा संघ सोडण्याच्या तयारीत आहेत. मागील काही वर्षात विदर्भ संघाची कामगिरी अभिमानास्पद राहिली आहे. यात विदर्भाच्या संघातील खेळाडूंनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली. विदर्भ संघाने २०१७-१८ आणि २०१८-१९ मध्ये दोनदा रणजी स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. २०२३-२४ मधील रणजी स्पर्धेच्या सत्रात उपविजेतेपद प्राप्त केले. विदर्भ क्रिकेट संघाचे प्रशिक्षक उस्मान घानी यांच्या नेतृत्वात प्रशिक्षण घेत असलेल्या सध्या विदर्भ संघात उलथापालथ बघायला मिळत आहे. सर्वप्रथम फलंदाज मोहित काळे विदर्भ संघ सोडत पुदुच्चेरीच्या संघात सामील झाला. यानंतर २०१७-१८ साली हॅट्रिक घेत विदर्भाला रणजी चषक जिंकवण्यात महत्वपूर्ण योगदान देणारा मध्यमगती गोलंदाज रजनीश गुरबानीने विदर्भ संघ सोडला. रजनीश आता महाराष्ट्राच्या संघातून क्रिकेट खेळणार आहे. विदर्भाच्या संघाला सर्वात मोठा धक्का बसला, जेव्हा स्टार खेळाडू आदित्य सरवटेने संघाला सोडण्याचा निर्णय घेतला. विदर्भ संघातील प्रशिक्षक चमूशी वादानंतर आदित्य हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. आदित्य सरवटे याच्या निर्णयाला विदर्भातील अनेक माजी खेळाडूंनी अन्यायकारक आणि दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा……अन् राज ठाकरेंनी स्वत: हातात घेतले ‘स्टीअरिंग’, वाशीम ते अकोला दरम्यान नेमकं काय झालं?
नेमके कारण काय?
विदर्भ क्रिकेट संघातील प्रशिक्षकांच्या कार्यपद्धतीमुळे अनेक खेळाडू नाराज आहे. या कारणावरून ते दुसऱ्या राज्यातील क्रिकेट संघात जात आहेत. दुसऱ्या राज्यात चांगल्या संधी मिळतील या आशेने खेळाडू विदर्भ संघ सोडत असल्याची कबुली विदर्भ क्रिकेट संघातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगणाच्या अटीवर दिली. माजी खेळाडू अपूर्व काळे यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत आदित्यच्या जाण्यामुळे विदर्भ संघाची मोठी हानी झाल्याचे मत व्यक्त केले. आदित्यचे जाणे बघणे कठीण आहे. सुपरस्टार खेळाडू केरळसाठी उत्तम कामगिरी करेलच, पण यामुळे विदर्भ संघाला मोठा तोटा झाला आहे, असे आदित्य काळे पुढे म्हणाले.