नागपूर : कोणताही वारसा नसताना न डगमगता सहकार क्षेत्रात उत्तम कार्य करून हजारो युवकांना रोजगार देणाऱ्या व्यक्तीचा हा सत्कार आहे, अशा शब्दात मान्यवरांनी प्रमोद मानमोडे यांचा गौरव केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कृषी विकास प्रतिष्ठानतर्फे माणिकलाल गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रमोद मानमोडे यांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते विदर्भ गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी, अरुण वानखेडे, किशोर कडू, नीलेश खांडेकर, निशांत गांधी उपस्थित होते.

हेही वाचा – नागपूर : हलबा समाजावर अन्याय, राष्ट्रीय आदिम कृती समितीचे आज आंदोलन

याप्रसंगी वडेट्टीवार म्हणाले, सहकार क्षेत्रात विश्वास संपादन करणे महत्त्वाचे असते. प्रमोद मानमोडे यांनी हजारो लोकांचा विश्वास संपादन केला. त्यांनी निर्मल उज्ज्वल सोसायटीच्या रोपट्याचे वटवृक्ष केले. त्यांच्या बँकेच्या ८६ शाखा असून यात सहा हजार युवकांना रोजगार दिला आहे. कापूस विदर्भातील व टेक्सटाईल पार्क पश्चिम महाराष्ट्रात असे चित्र आहे. पण मानमोडे यांच्या टेक्सटाईल युनिटमधून आज जगातील सर्व मोठ्या ब्रँडला कापड पुरवला जातो. काळ्या मातीतून उगवणाऱ्या पांढऱ्या सोन्याला न्याय देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्यासाख्या कर्तबगार माणसाची गरज राज्याच्या सर्वोच्च सभागृहात आहे. त्यांची ती इच्छा पूर्ण व्हावी, त्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आमचे सहकार्य राहिले, असेही वडेट्टीवार म्हणाले.

अनिल देशमुख म्हणाले, मानमोडे यांनी स्वत:च्या हिमतीने व्यवसाय उभा केला. अनेक संकटांना सामोरे गेले. पण ते डगमगले नाहीत. रोजगार देण्यावर त्यांची एवढी निष्ठा आहे की, त्यांनी आपल्या कार्यालयाबाहेर देणगी मागू नये, मागायचे असेल तर रोजगार मागा, अशी पाटी लावली आहे. त्यामुळे मानमोडे यांचा हा सत्कार म्हणजे ज्या बेरोजगारांना मानमोडे यांनी रोजगार दिला त्यांचा सत्कार आहे.

हेही वाचा – “सुरक्षा रक्षकांना पोलिसांची जबाबदारी देणार का?”, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा प्रश्न; म्हणाले…

सहकार क्षेत्रात उत्तम कार्य करणारे मानमोडे खऱ्या अर्थाने विश्वकर्मा आहेत. त्यांच्यात प्रचंड क्षमता आहे. त्यांनी टाटा आणि बिर्ला उद्योग समूहाशी स्पर्धा करावी, असे गिरीश गांधी म्हणाले. या कार्यक्रमाला प्रमोद मानमोडे यांच्या मातोश्री, पत्नी आणि मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते. संचालन कोमल ठाकरे यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी आभार मानले.

विदर्भात एक लाख रोजगार देणार – मानमोडे

सत्काराचा विनम्रपणे स्वीकार करताना प्रमोद मानमोडे यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, मी दिवसा स्वप्न बघतो. १९८९ मध्ये निर्मल उज्ज्वल सोसायटी स्थापन केली. आज पाच राज्यांत शाखा आहेत. राज्यातील कुशल नेतृत्वाने पाठीशी उभे राहावे. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात गारमेंट हाऊस उभारायचे आहे. येथील एक लाख युवकांना रोजगार देण्याची आपली योजना आहे, असे त्यांनी सांगितले. व्यवसायात लहान असताना फार त्रास झाला नाही. मात्र, व्यवसाय वाढल्यानंतर त्रास द्यायला सुरुवात झाली. विरोधी विचाराचा असल्यामुळे त्रास दिला जात आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidarbha gaurav award given to pramod manmode rbt 74 ssb