नागपूर: राज्यात आणि विशेषकरुन विदर्भात तापमानाचा पारा चांगलाच चढला होता. विदर्भातील तापमान ४६ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचले होते. तब्बल तीन शहरे ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर अधिकांश शहरांमध्ये पारा अंश सेल्सिअसवर गेला होता.

मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात देखील तापमानाने बरेच रेकॉर्ड मोडले होते. याठिकाणीदेखील अनेक शहरांमध्ये पारा ४४ अंशापर्यंत जाऊन पोहोचला होता. संपूर्ण राज्यच उष्णतेत होरपळत असताना हवामान खात्याने आता दिलासा देणारा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान खात्याने येत्या तीन ते चार दिवसांसाठी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात येत्या तीन ते चार दिवसात संमीश्र स्वरुपाचे हवामान राहण्याची शक्यता आहे. विदर्भात रविवार आणि सोमवार असे दोनही दिवस गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय वादळी वाऱ्यासह आणि ढगांच्या गडगडासह पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला असून काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठवाडा, मध्य महाराष्ट्र येथेही उष्णदमट हवामानासह पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील चंद्रपूर तसेच गडचिरोली जिल्ह्याला रविवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट तर २८ एप्रिल म्हणजेच सोमवारी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये तसेच मराठवाडा अन् दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पर्वतीय भागांमधील हवामानामध्ये झालेल्या बदलांसह दक्षिण भारताकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील हवामानावर परिणाम होत आहे. गेले काही दिवस राज्यात तापमानात चांगलीच वाढ झाली होती. ब्रम्हपूरी येथे सर्वाधिक ४५.९ अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली. चंद्रपूर तसेच अकोला येथेही तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. तर अनेक शहरांमध्ये तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही शहरांमध्ये तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचले. मात्र, आता हवामानात बदल होणार असून पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होत आहे. विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातही मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

प्रामुख्याने लातूर, धाराशिव, नांदेड, सोलापूर या भागात गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे. तर, अकोला परिसरात उष्णतेची लाट मात्र कायम असेल. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगलीपासून सिंधुदुर्गापर्यंत पावसाळी वातावरण असणार आहे. तर काही ठिकाणी वादळी पावसाची हजेरी राहील. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे.