लोकसत्ता टीम
नागपूर : विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून येत्या दहा जुलै पर्यंत पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. विदर्भासह कोकणातही पावसाचा जोर वाढणार असून काही जिल्ह्यात पावसाचा ‘येलो अलर्ट’ तर काही जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.विदर्भासह कोकणात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
विदर्भात आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून लपंडाव करणारा पाऊस आज मात्र सकाळपासून कोसळत आहे. हा पाऊस सर्वत्र सुरू आहे. मोसमी पावसाने संपूर्ण विदर्भ व्यापला असला तरीही पावसाने मात्र विदर्भाकडे पाठ फिरवली होती. पश्चिम विदर्भात थोडाफार पाऊस झाला पण पूर्व विदर्भात पावसाने दडी मारली होती. अवकाळी पावसाने मात्र विदर्भात तांडव घातले होते. जूनच्या अखेरपर्यंत पाठ फिरवणार पाऊस जुलै पासून हलक्या स्वरूपात कोसळत आहे. समुद्रसपाटीवरील दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टी लगत असलेल्या कमी दाबाचा पट्टा आज कायम आहे. रविवार सात जुलै पासून पुढील पाच दिवस कोकण व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यात ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता आहे.
आणखी वाचा-वन्यप्राण्यांच्या अपघाती मृत्यूच्या माहितीसाठी काम करणार ‘आर्म’ भ्रमणध्वनी ॲप
विदर्भात आठ ते दहा जुलैदरम्यान काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने वरील सर्व ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ आणि कोकणात पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणी येलो तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात येत्या दहा जुलै पर्यंत सर्वच जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात दहा जुलैला काही ठिकाणी तर सात ते नऊ जुलै दरम्यान बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
आणखी वाचा-जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत अकोल्यातील जवान शहीद
आज ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात तसेच नाशिक व पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता असल्याने वरील सर्व ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आजपासून पुढील पाच दिवस कोकणातील बहुतांश तर मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील काही जिल्ह्यातून ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाच्या वादळी वाऱ्यास हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. पण जोरदार पाऊस नाही. हवामान विभागाने राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज दिला.