नागपूर : विदर्भाचा भारतीय संस्कृतीत आपले वेगळेपण असून पुरातत्त्व खात्याच्या उत्खननातून समृद्ध वारसा इंडियन सायन्समध्ये दिसतो. अडम, मनसर आणि पवनी गावातील वैभव या प्रदर्शनात दर्शवण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यात (भंडारा नागपूर सीमेवर) अडम गावी डॉ. अमरेंद्र नाथ यांनी (१९८८-१९९२) उत्खनन केले होते, तेथून प्रथमच ताम्रपाषाण-लोहयुग, निरंतर सातवाहनपूर्व आणि सातवाहन काळातील सांस्कृतिक ठेवी सापडल्या आहेत.
तटबंदीच्या सातवाहन शहराच्या अवशेषांव्यतिरिक्त, येथून महत्त्वाच्या पुरातन वास्तू आणि मातीची नाणी सापडली आहेत, ज्यावर ब्राह्मी लिपीत ‘असिक जनपद’ कोरलेले आहे. भंडारा जिल्ह्यात पवनी येथे जे.पी. जोशी आणि एस.बी. देव यांनी (१९६८-७०) आणि १९९३-९४) उत्खनन केले. उत्खननात मौर्य काळातील प्राचीन स्तुपावर बांधलेल्या शूंग स्तुपाचे पुरावे मिळाले. १९९३-९४ मध्ये डॉ. अमरेंद्र नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या उत्खननात मौर्यपूर्व व मौर्य कालखंड, शूंग, सातवाहन व वाकाटक यांचे पुरावे मिळाले आहेत.
हेही वाचा >>> भूगर्भातील खनिज शोधणारे ड्रोन विकसित
नागपूर जिल्ह्यातील मनसर येथे डॉ. अमरेंद्र नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन (१९९४-९५) करण्यात आले, तेथून वाकाटक काळातील विटांनी बनवलेल्या मंदिराचे अवशेष मिळाले. पुरातन वास्तूंमध्ये उमा-महेश्वरा, लज्जागौरी, टेराकोटाच्या मूर्ती, लोखंडी चिलखत असलेल्या स्टुकोच्या मूर्ती, क्षत्रप आणि वाकाटक राज्यकर्त्यांची चांदी आणि तांब्याची नाणी आणि टेराकोटा साचे यांचा समावेश आहे. येथून मिळालेल्या मातीच्या भांड्यांच्या अभ्यासाच्या आधारे हे प्राचीन स्थळ इ.स. पूर्व दुसऱ्या शतकातील असल्याचे दिसून येते.
हेही वाचा >>> विज्ञान काँग्रेस अन् हळदी कुंकवाचा काय संबंध? शहरातील पुरोगामी मान्यवरांचा सवाल
वारसा प्रदर्शनात नागपूरसह विदर्भातील महत्त्वाच्या वास्तूंची माहिती दर्शवण्यात आली आहे. यात काशीबाई का छत (वर्धा), नगरधन किल्ला, जागृतेश्वर मंदिर (भंडारा), विटांचे मंदिर(वर्धा) यासह नागपुरातील कस्तुरचंद पार्क, जुने उच्च न्यायालय, जुने सचिवालय, विधानभवन, भारतीय रिझर्व बँक, भारतीय टपाल कार्यासलय या इमारतीचे वास्तुकला वारसा प्रदर्शनाच्या दर्शनी भागात ठळकपणे मांडण्यात आले आहे.
गोंड वास्तुकला
गोंड राजावटीतील वास्तुकलेचे सुंदर नमुने या प्रदर्शनात आहेत. यात मुख्यत्वे गोंड राजाचे राज्य चिन्ह, गोंड राजाची समाधी (चंद्रपूर), जाटपुरा द्वार आणि विस्तीर्ण परिसरात स्थित असलेला बल्लारपूर किल्ला दर्शवण्यात आला आहे.
झाडीबोली आणि दंडार
भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे झाडीबोलीचा वापर होतो. या भाषेतील ‘जागली’, ‘पोरका’, ‘वास्तुक विश्वंभर’, ‘लाडाची बाई’ पुस्तके ‘अंजनाबाईची कविता’, ‘आडवा कविता’, ‘झाडीची कानात सांग’, ‘घामाचा दाम’, ‘झाडीची माती’ आदी काव्यसंग्रहांची नावे या ठिकाणी ठळकपणे प्रदर्शित करण्यात आली आहेत.