आपापसातील आरोप-प्रत्यारोपांची लागण
विदर्भाच्या रंगभूमी चळवळीला मोठा इतिहास असून अनेक कलावंत या रंगभूमीने दिलेले असताना चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात मात्र गेल्या दोन वर्षांत विदर्भासह उपराजधानीत दहा ते बारा चित्रपटाची निर्मिती करण्यात आली, पण त्यात फारसे यश आलेले नाही. एकीकडे विदर्भातील सांस्कृतिक वैभव वाढावे, असे बोलले जात असताना दुसरीकडे मात्र या क्षेत्रातील मंडळी उणीदुणी काढून एकमेकांनाच लक्ष्य करीत असतील तर कशी होईल दर्जेदार चित्रपटांची निर्मिती, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या दोन वर्षांत विदर्भात अनेक हौसे-नवसे कुठलाही अनुभव नसताना चित्रपट क्षेत्रात उतरले आणि कोटय़वधी रुपये खर्च करूनही त्यांना यात यश आलेले नाही. दोन वर्षांत नागपुरात १० चित्रपटांची निर्मिती करण्यात येऊनही त्यातील बहुतेक चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडे डबाबंद आहे. उत्साहाच्या भरात अनेक नवोदित निर्माते व दानदात्यांकडून किंवा प्रसंगी कर्ज काढून चित्रपट उभे करीत असले तरी निर्मितीपासून कलावंत, वितरण व्यवस्था, प्रचार व प्रसार या वेगवेगळ्या पैलूंवर मात्र अभ्यासाअभावी ते अपयशी ठरले आहेत. रमण सेनाड आणि त्यांच्या मित्रमंडळींनी ‘अघोर’ची निर्मिती केली. त्यानंतर शेखर पटले यांनी ‘हिरवा चुडा’, माजी आमदार आणि भाजप नेते यशवंत बाजीराव यांनी ‘रंग माझा वेगळा’, त्यानंतर नुकताच प्रदर्शित झालेला रूपाली बिरे, देवेंद्र वेलणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निर्मित केलेला ‘ते दोन दिवस’ अशा अनेक चित्रपटांची निर्मिती उपराजधानीत करण्यात आली. स्थानिक कलावंतांसह चित्रपटाला यश येत नाही, अशी मानसिकता झाल्यामुळे मुंबईच्या आघाडीच्या कलावंतांना सोबत घेऊन निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, तरीही गेल्या दोन वर्षांत या क्षेत्रात फारसे यश मिळालेले नाही. मधल्या काळात मध्य भारतातही चित्रपट निर्मितीच्या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळावी, या हेतूने सेंट्रल इंडिया फिल्म प्रोडय़ुसर्स असोसिएशन (सिफ्पा)ची स्थापना करण्यात आली. मात्र, त्यांचे काम संथगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे.
या संदर्भात अ‍ॅड. रमण सेनाड म्हणाले, मुंबई-पुण्याच्या तुलनेने विदर्भातील चित्रपट निर्मितीला फारसे यश मिळत नाही, याची कारणे वेगवेगळी असली तरी आपल्याकडे बदलत्या काळानुसार अत्याधुनिक पद्धतीने चित्रपट निर्मितीचा अभ्यास कमी पडतो. या क्षेत्रात यशापयश असले तरी आपल्याकडील निर्मात्यांपासून ते कलावंतांनी मानसिकता बदलण्याची गरज आहे. जो व्यावसायिक दृष्टीकोन असावयास हवा तो आपल्याकडे नाही. एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा सर्वानी एकत्र येऊन या क्षेत्रात काम केले तर मुंबई-पुण्याच्या तुलनेत विदर्भाची चित्रपटसृष्टी चांगली होईल.
रूपाली बिरे म्हणाल्या, गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात नवीन निर्माते येत असले तरी आमच्यात अनुभवाची कमी आहे. ज्या पद्धतीने मार्गदर्शन मिळायला पाहिजे ते मिळत नाही. अनेकदा पैशामुळे फसवणूक होते. चित्रपट निर्मितीत लागणारा पैसा उभारणे ही कसरत असली तरी अनेकदा त्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि त्यानंतरही अपयश येते, ही वस्तुस्थिती आहे. यशवंत बाजीराव म्हणाले, हा व्यवसाय असल्यामुळे या क्षेत्रात ज्यांना अनुभव आहे त्यांनीच यावे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि उणीदुणी काढत बसण्यापेक्षा विदर्भातील दर्जेदार चित्रपट निर्मिती कशी वाढले, या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे.