नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूर आणि मराठवाड्यातील प्रमुख शहर संभाजीनगर दरम्यान एकही रेल्वेगाडी नसल्याने विदर्भ-मराठवाड्यातील प्रवाशांची कोंडी होत आहे. विदर्भातील नागपूर आणि मराठावाड्यातील संभाजीनगर हे शहर शिक्षण व औद्योगिकरणासाठी महत्वाचे आहेत. या दोन्ही शहरात युवक रोजगार, नोकरी व्यवसायाकरिता मोठ्या संख्येने प्रवास करतात. याशिवाय मुंबई उच्च न्यायालयाचे दोन खंडपीठ नागपूर व संभाजीनगर येथे आहेत. यामुळे या दोन्ही शहरादरम्यान थेट रेल्वे असावी ही फार जुनी मागणी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही वर्षांपूर्वी नागपूर ते मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस सुरू करण्यात आली होती. ही गाडी करोनापश्चात आदिलाबाद ते मुंबई आणि नंतर बल्लारपूर ते मुंबई अशी सोडण्यात येत आहे. अजनी-कुर्ला विशेष गाडी सुरू करण्यात आली होती. ती करोना काळापासून बंद आहे. परिणामी, नागपूर ते संभाजीनगर अशी थेट एकही गाडी उपलब्ध नाही.

हेही वाचा…सोन्याचे दर ७० हजारांपर्यंत येणार? आणखी मोठी घसरण…

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, संत्रागाछी-नांदेड एक्सप्रेस (नागपूर मार्गे) आठवड्यातून एकदा गुरुवारी धावते. पाटणा-कुर्ला एक्सप्रेस नागपूरमार्गे आदिलाबाद, नांदेड, पूर्णा मार्गे धावते. ही साप्ताहिक (रविवारी) गाडी आहे. धनबाद-कोल्हापूर एक्सप्रेस नागपूरमार्गे आदिलाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी आणि कोल्हापूरला जाते. या तीन गाड्या नागपूर ते नांदेड दरम्यान आहेत. परंतु, संभाजीनगरसाठी एकही गाडी नाही. याबाबत नागपूर-संभाजीनगर प्रवास करणारे प्रशांत डाळींबकर म्हणाले, सणासुदीच्या काळात या मार्गाने मोठा जनसमुदाय ये जा करत असतो. परंतु, या मार्गावरील एकमेव रेल्वेही बंद करण्यात आली. दिवाळी, दसऱ्याच्या काळात खासगी बसचे भाडे वाढवले जातात. नागपूरहून मनमाड मार्गे संभाजीनगरला ये-जा करणे परवडत नाही. अधिक वेळ जातो. त्यामुळे विद्यार्थ्याना परीक्षेच्या काळात अडचणींना सामोरे जावे लागते. एस.टी.बसची स्थिती सुद्धा फार चांगली नाही. त्यामुळे वयोवृद्ध, अपंग, सेवानिवृत्त लोकांसमोर नागपूर ते संभाजीनगर प्रवास कसा करावा, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

रेल्वे अधिकारी काय म्हणतात?

मराठवाड्याकरिता अनेक रेल्वे आहेत, असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी सांगितले. परंतु, संभाजीनगरबद्दल बोलण्यास त्यांनी नकार दिला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidarbha marathwada passengers facing problem due to no train between nagpur to sambhajinagar rbt 74 sud 02