नागपूर: स्वतंत्र विदर्भ राज्य आणि विदर्भातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून नागपुरात १६ डिसेंबरपासून आयोजित हिवाळी अधिवेशनात आक्रमक रुप धारण करण्याचे निश्चित झाले आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून धरणे आंदोलन केले जाणार आहे. हे आंदोलन समितीकडून विदर्भ आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याच्या हेतूने होणार आहे. आंदोलनातून केंद्र सरकार आणि राज्य शासनाला स्वतंत्र विदर्भाचे राज्य  निर्माण करण्याचा इशारा दिला जाणार आहे. नियोजनानुसार अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी १६ डिसेंबर २०२४ ला सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत यशवंत स्टेडियम येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> यवतमाळ शहरातील आर्णी मार्गाच्या बांधकामात त्रुटी; न्यायालयाकदून प्रधान सचिवांसह ११ जणांना…

आंदोलनात स्वतंत्र विदर्भ राज्य केंद्र सरकारने  निर्माण करावे, शेतकऱ्याची संपूर्ण कर्ज मुक्ती करावी, विजेची दरवाढ राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावी, शेतीपंपाला दिवसाचे लोडशेडिंग बंद करावे, स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, विदर्भ वैधानिक विकास मंडळ नको, अन्नधान्यावरील जी.एस.टी तात्काळ रद्द करावे, साप चावून मरणाऱ्या व्यक्तीस इतर वन्यप्राण्याप्रमाणे मदत मिळावी. सहप्रवासी हेलमेट  सक्ती मागे घेण्यात यावी, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई तात्काळ देण्यात यावी, पीक विमा धारक शेतकऱ्यांना तात्काळ पीकविम्याची मदत देण्यात यावी, कापूस व सोयाबीन पिकाला इतर राज्याप्रमाणे ३० टक्के भाववाढ देण्यात यावी या मागण्या प्रमुख्याने केल्या जाणार आहे.

हेही वाचा >>> एसटी महामंडळात यंदाच्या वर्षी अपघाताचे प्रमाण सर्वाधिक ! सहा वर्षांची तुलना, प्रवाश्यांचा वाली कोण?

विदर्भप्रेमी जनतेने धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समिती संस्थापक अध्यक्ष ॲड. वामनराव चटप, शेतकरी नेते प्रकाश पोहरे, जेष्ठ नेते डॉ. श्रीनिवास खांदेवाले, महिला आघाडी अध्यक्षा रंजनाताई मामर्डे, पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुणभाऊ केदार, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, कोअर कमेटी सदस्य तात्यासाहेब मत्ते, जी. एस. ख्वाजा, आणि इतरांनी केले आहे. अधिवेशनाच्या तोंडावर नागपुरात स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन होणार असल्याने सरकारची डोकेदुखी वाढणार आहे. दरम्यान यापूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी समितीकडून मोर्चा काढला जात होता. या मोर्चादरम्यान तणाव निर्माण होत होता. यंदा धरणे आंदोलन असल्याने त्यात आंदोलकांकडून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काय वेगळे  केले जाईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader