लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघच नाही तर या व्याघ्रप्रकल्पातील वाघांचे बछडेही करामती करुन पर्यटकांना आकर्षित करत आहेत. ताडोबात ‘मटका’ या वाघाने आधी साम्राज्य गाजवले, पण त्याचा वारसदार म्हणजेच ‘छोटा मटका’ त्यापेक्षाही करामती निघाला. आता तर या छोट्या मटक्याचे तिन्ही बछडे हाच वारसा पुढे चालवत आहे. खरं तर वयाची दोन वर्षे पूर्ण होत असताना वाघ शिकार करायला शिकतो. मात्र, हे बछडे कमी वयातच शिकारीचा प्रयत्न करायला लागले आहेत. भलेही शिकार त्यांच्या हातून सुटली तरीही पर्यटकांना त्यांच्या या करामतीने वेड लावले आहे.

अलीकडेच भारतीय क्रिकेट जगतातील दोन दिग्गज फलंदाज सचिन तेंडूलकर आणि गोलंदाज अनिल कुंबळे व्याघ्रदर्शनासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात येऊन गेले. या दोघांनाही वेगवेगळ्या नावांनी परिचित असलेल्या वाघांनी दर्शनही दिले. अनिल कुंबळेने ज्या ‘छोटा मटका’ या बफर क्षेत्रात अधिराज्य गाजवणाऱ्या वाघासाठी त्याचा मुक्काम वाढवला. त्या ‘छोटा मटका’ने त्याला हुलकावणी दिली आणि कुंबळेला त्याच्या दर्शनाविनाच परतावे लागले. त्याच्या दोन दिवसानंतरच हा वाघ आपल्या तिन्ही बछड्यांसह ताडोबाच्या रस्त्यावर शिकार शोधताना दिसला. ‘छोटा मटका’ हा वाघ आणि ‘बबली’ या वाघिणीला दीड वर्षाचे दोन नर बछडे ‘काली’ आणि ‘बाली’ तसेच एक मादी बछडा ‘शौरी’ आहेत.

आणखी वाचा-यवतमाळ : पोहरादेवीला नवस फेडायला जाताना अपघात, पाच ठार

ताडोबातील नवेगाव सफारी प्रवेशद्वारावरुन पर्यटक सफारीसाठी निघाल्यानंतर त्यांना हे कुटुंब रस्त्यावर दिसले. ‘छोटा मटका’ या बछड्यांसाठी शिकार शोधत असताना त्यातील एका बछड्याने त्याचेच अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. एक मोठे रानडुक्कर त्याला रस्ता ओलांडताना दिसले. कुटुंबापासून थोड्या दूर अंतरावर चालत असलेल्या या बछड्याला ते दिसले आणि तो त्या रानडुकराच्या मागे धावायला लागला. मात्र, हे रानडुक्कर प्रचंड मोठे होते आणि ते काही त्या बछड्याच्या आवाक्यात आले नाही. दरम्यान, तो पुन्हा त्याच्या कुटुंबात सामील झाला आणि ‘छोटा मटका’ सोबत झाडांच्या मागे लपला. त्यानंतर ‘छोटा मटका’ शिकारीसाठी समोर आला. काही वर्षांपूर्वी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात ‘जय’ नामक वाघ प्रसिद्ध झाला होता. नागझिरा अभयारण्यात असताना त्याने अवघ्या दीड वर्षातच रानगव्याची शिकार केली होती. हे बछडेही तोच कित्ता गिरवताना दिसून आले. ‘डेक्कन ड्रिफ्टस’चे पीयूष आकरे आणि कांचन पेटकर यांनी ही कामगिरी टिपली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of chhota matka calf hunting in tadoba andhari tiger project is going viral rgc 76 mrj
Show comments