लोकसत्ता टीम
नागपूर : पर्यटनाचा हंगाम अगदी शिगेला पोहोचला असताना ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांची अक्षरश: गर्दी उसळली आहे. वाघांच्या एका दर्शनासाठी आसुसलेल्या पर्यटकांच्या नजरा ताडोबातील गाभा क्षेत्रातच नाही तर बफर क्षेत्रातही दिसून येतात. त्यातही आता बफर क्षेत्रातील वाघांनी जणू गाभा क्षेत्रातील वाघांशी स्पर्धा सुरू केली. परिणामी पर्यटक गाभा क्षेत्राऐवजी बफर क्षेत्रातच अधिक दिसू लागले आहेत. येथील वाघांनाही जणू हे कळले आहे आणि याच बफर क्षेत्रातून पर्यटकांना वाघाच्या नवनव्या करामती पाहायला मिळत आहेत.
पर्यटनाचा हंगाम असल्याने या व्याघ्रप्रकल्पाच्या दोन्ही क्षेत्रातील सफारी जवळजवळ पूर्णपणे फुल्ल झाल्या आहेत. उन्हाळ्यात शाळा, महाविद्यालयाच्या सुट्यांमुळे इतर अभयारण्य, व्याघ्रप्रकल्पांच्या तुलनेत पर्यटकांचा ओढा ताडोबा व्याघ्रप्रकल्पाकडे अधिक आहे. नवेगाव निमढेला सफारी क्षेत्रातून असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. उन्हाळा असल्यामुळे पाण्यात बसून मस्ती करणारे, पाणी पिणारे वाघ अशी दृश्य सगळीकडेच दिसून येतात. अगदी कालपरवाच्या एका व्हिडिओतील वाघांनी मात्र सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.
आणखी वाचा-यवतमाळ : सर्पदंशाने चिमुरडीचा मृत्यू, वेळेवर उपचार न झाल्याने…
‘नयनतारा’ ही वाघीण आणि ‘डेडली बॉईज’ हा वाघ नवेगाव निमढेला सफारी क्षेत्रातल्या नैसर्गिक पाणवठ्याच्या काठावरुन जात होते. तलावातील पाणी अगदी स्वच्छ होते आणि याच स्वच्छ पाण्यात त्यांचे प्रतिबिंब अगदी स्पष्ट दिसत होते. जणू काही तलावाच्या काठावरील दोन वाघांसोबतच तलावातून देखील दोन वाघ मार्गक्रमण करत आहे. वन्यजीव अभ्यासक कांचन पेठकर आणि डेक्कन ड्रीफ्टसचे प्रमुख पीयूष आकरे यांनी हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला, पण त्याचवेळी पर्यटकही आश्चर्यचकीत झाले. नवेगाव निमढेला सफारी क्षेत्रात ‘नयनतारा’ आणि ‘डेडली बॉईज’ यांचे तलावात दिसणरे स्पष्ट प्रतिबिंब पाहून पर्यटकांना एकाचवेळी चार वाघ चालत असल्याचा अदभूत अनुभव आला.