नागपूर: जगभरातील पर्यटकांना आकर्षित करुन घेण्याची क्षमता आहे ती ताडोबातील वाघांमध्येच. जागतिक पर्यटन नकाशावर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे नाव अग्रक्रमावर आहे. अर्थातच त्यात ताडोबातील वाघांचे योगदान आहे. अलीकडेच याच ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील ‘नयनतारा’ या वाघिणीने थेट इटलीत धडक मारली. इटालिया ग्रीन फिल्म फेस्टिव्हलच्या पुरस्कार सोहोळ्यात ‘गोल्डन लीफ’ पुरस्कारावर या वाघिणीने नाव कोरले.
काही महिन्यांपूर्वी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील निमढेला या बफर क्षेत्रात ‘नयनतारा’ या वाघिणीचा वाहत्या नाल्यातून प्लास्टिकची बाटली तोंडात पकडून बाहेर काढतानाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाला. जगभरातच या व्हिडीओची चर्चा झाली. तब्बल २३ सेकंदांचा हा व्हिडीओ वन्यजीवप्रेमी व वन्यजीव छायाचित्रकार दीप काठीकर यांनी चित्रित केला होता. या व्हिडीओतून दोन संदेश बाहेर पडले. एक तर वाघिणीला असलेली पर्यावरणाची चिंता आणि दुसरे म्हणजे ताडोबा व्यवस्थापनाचा बेजबाबदारपणा वन्यजीवांसाठी कसा धोकादायक ठरु शकतो. भानूसखिंडी या प्रसिद्ध वाघिणीच्या पोटी जन्माला आलेली नयनतारा तिच्या डोळ्यांमुळे सतत चर्चेत आहे. तिच्या निळ्या डोळ्यांमुळे पर्यटकांनीच तिचे नामकरण ‘नयनतारा’ असे केले. ताडोबा बफर क्षेत्रातील जांभूळडोह परिसरातील सिमेंट बंधारा परिसरातील नाल्यावर ती पाणी पिण्यासाठी गेली असताना तिच्या तोंडाला पिण्याच्या पाण्याची प्लास्टिक बाटली लागली आणि मग पाणी न पिता ती चक्क ती बाटली घेऊन बाहेर आली.
हेही वाचा >>>“माझ्याकडे गद्दारांची यादी, वेळ आल्यावर…” सुधीर मुनगंटीवार यांचा गौप्यस्फोट; काँग्रेसमध्येही खळबळ
दीप काठीकर यांच्या या व्हिडीओवर जगभरात प्रतिक्रिया उमटल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या भावनिक व्हिडीओवर भाष्य केले होते. त्याच व्हिडीओची दखल आता इटलीत देखील घेतली गेली. ३० जुलैला इटलीतील कॅम्पिडोग्लिओच्या प्रोमोटेका हॉलमध्ये इटालिया ग्रीन फिल्म फेस्टिव्हलचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. पर्यावरण आणि निसर्गाशी निगडित हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड अशा विविध विषयांवर आयोजित लघुपटांना यात पुरस्कार देण्यात आले. प्रामुख्याने लघुपटाच्या माध्यमातून पर्यावरण आणि सामाजिक समस्यांवर जागरुकता निर्माण करण्यासाठी हा सोहोळा आयोजित करण्यात आला होता. यात भारताबाहेरील लघुपटासाठी दीप काठीकर यांच्या यांच्या २३ सेकंदाच्या ‘नयनतारा वाघिणी’च्या लघुपटाला पुरस्कार देण्यात आला. दीप काठीकर यांच्यावतीने इटलीतील भारतीय दुतावासातील आयचा सालेम यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर आयोजकांमधील एक व्यक्तीने माझा हा व्हिडीओ शेअर केला. त्यानंतर त्यांनी आमच्याशी संवाद साधला आणि ही गोष्ट पुढे सरकत पुरस्कारापर्यंत पोहोचली, असे दीप काठीकर यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले.
© The Indian Express (P) Ltd