वर्धा : गेल्या दहा जुलैपासून जिल्ह्यात आलेला पाहुणा गावाकऱ्यांना चांगलाच हैराण करीत आहे. वर्धा जिल्ह्याचा मूळ निवासी नसणारा हा पाहुणा म्हणजे उमरेडच्या जंगलातून आलेला वाघ होय. त्याच्या डरकाळ्या अनेक गावांना जीव मुठीत घेऊन जगायला भाग पाडत आहे. कारण सततचा पाऊस असल्याने वनखात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्याने सळो की पळो करून सोडले आहे. त्यामुळे अफवांचा बाजार गरम झाला.

याच अनुषंगाने हिंगणघाट परिसरात दोन वाघ असलेला एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. आजंती परिसरात हे दोन वाघ सोबत फिरत असल्याचे सांगितल्या जाते. सहायक वन संरक्षक पवार यांनी तो व्हिडीओ वर्धा जिल्ह्यातील नसल्याचे स्पष्ट केले. या परिसरात फिरत असलेला वाघ उमरेड येथून आला असून त्यास पकडण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणतात.

हेही वाचा – सावधान! राज्यातील वाघांना बहेलिया शिकाऱ्यांचा धोका, व्याघ्रदिनाच्या पूर्वसंध्येला…

गेल्या दहाच दिवसांत या वाघाने भर पावसात मनसोक्त भिजत सात जनावरं फस्त केलीत. उंदीरगाव, चिंचघाट व अन्य गावात या वाघाने एक बैल, एक वासरू, एक गाय तसेच तीन रानडुकरे मारली आहेत. सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. पण वाघाच्या भीतीने शेतकरी, शेतमजूर शेतात जायला धजावत नसल्याचे दिसून येते. प्रामुख्याने नदी, नाले, पोथरा धरण परिसरात त्याचा वावर असल्याचे दिसून आले. वन कर्मचारी त्याच्या मागावर आहेत. तसेच तीन जिप्सी गाड्यांमार्फत ठाव घेणे सुरू झाले आहे. गावकरी त्रस्त झाल्याने आमदार समीर कुणावार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मदतीचे साकडे घातले. त्यामुळे वनमंत्र्यांनी जिल्हा वन खात्यास या वाघास पकडून सुरक्षितस्थळी सोडण्याचे निर्देश दिलेत.

हेही वाचा – “आरक्षणाला धक्का लागल्यास राजकारणातून संन्यास घेणार,” खासदार प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टच सांगितले…

तर वन परीक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर यांनी सावधानतेचा ईशारा दिला. सदर वाघ हा समुद्रपूर तालुक्यातील आरंभा व किन्हाळा गावात काही दिवसांपूर्वी आढळून आला. म्हणून कोणीही रात्री किंवा पहाटे शेतात जाऊ नये. वाघाच्या पाऊलखुणा, मारलेले प्राणी दिसून आल्यास कळवावे, असे आवाहन खेडकर यांनी केले. समुद्रपूर येथील वन परीक्षेत्र अधिकारी गावंडे म्हणाले की सध्या चिंचघाट येथील ३० हेक्टर परिसरातील झूडपी जंगलात या वाघाचे बस्तान आहे. संततधार सुरू असल्याने वाघास पकडण्याच्या कार्यात मोठे अडथळे आहेत. त्यामुळे टेहळणी करण्याचे काम वन खाते करीत आहे.