लोकसत्ता टीम
नागपूर : मेडिकल रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहात एका महिला डॉक्टरचे दुसऱ्या निवासी डॉक्टरकडून आंघोळ करतानाचे मोबाईलवर चलचित्र (व्हिडियो रेकॉर्डिंग) काढण्याचा प्रयत्न झाला. मेडिकल प्रशासनाने तक्रार मिळताच सहा सदस्यीय समितीकडून चौकशी सुरू केली आहे.
मेडिकलमध्ये निवासी डॉक्टरांसाठी स्वतंत्र वसतिगृह आहे. येथे महिला व पुरुष डॉक्टरांच्या निवासाची सोय आहे. गुरुवारी रात्री द्वितीय वर्षाला असलेली महिला निवासी डॉक्टर आंघोळीला गेली असताना एका निवासी डॉक्टरने मोबाईलमध्ये चलचित्र काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार महिला डॉक्टरच्या निदर्शनात येताच तिने आरडाओरड केली.
शुक्रवारी दुपारनंतर अधिष्ठाता कार्यालयात तक्रार करण्यात आली. अधिष्ठात्यांनी तातडीने वसतिगृहाचे वॉर्डन डॉ. गौर व निवासी डॉक्टरांच्या प्रतिनिधींसह बैठक घेतली. संबंधित डॉक्टरच्या मोबाईलची झडती घेतली असता कोणतेही छायाचित्र वा चलचित्र आढळले नाही. तातडीने चौकशीसाठी उपअधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहोरे, उपअधिष्ठाता डॉ. उदय नारलेवार, डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. गौर, डॉ. मनीष ठाकरे, डॉ. जयेश मुखी यांची सहा सदस्यीय समिती गठित करण्यात आली. याबाबत विचारणा करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशी तक्रार आल्याचे मान्य केले.