यवतमाळ : यवतमाळ-दारव्हा मार्ग पावसाळ्यात सतत बंद राहत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या मार्गावरील बोरीअरब येथील अडाण नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी तात्पुरता रपटा उभारला आहे. थोडाही पाऊस कोसळला तर त्यावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद होतो. रविवारी अडाण नदीची पाण्याची पातळी वाढल्याने दुपारपासून हा मार्ग बंद झाला. आज या रपट्यावरून एक स्कुटी नदीत वाहून गेल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कुर्मगतीचा निषेध केला आहे. गेल्या तीन वर्षापासून या पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, हा पूल अद्यापही अपूर्ण असल्याने या परिसरातील नागरिकांना पाऊस आल्यावर त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने आज दुपारी जोरदार हजेरी लावली. मेघगर्जनेसह पाऊस कोसळला. काही ठिकाणी हलक्या गाराही कोसळल्या. यामुळे रक्षाबंधनाच्या निमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली होती. जुलै महिन्यात सलग पाऊस कोसळल्याने सर्वत्र परिस्थिती जलमय झाली होती. चार हजारपेक्षा अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात शेतकऱ्यांना जवळपास साडेतीनशे कोटी रुपयांचा फटका बसला.
हेही वाचा – मुलींना शिक्षण मोफत, तरीही शुल्क वसूलल्यास आता थेट कारवाई
पावसाने उसंत घेतल्याने आता शेतीत निंदन, खुरपण आदी कामे सुरू होती. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून सर्वत्र उकाडा वाढला होता. दरम्यान आज दुपारपर्यंत सर्वत्र कडाक्याचे ऊन असताना तीन वाजता नंतर वातावरण बदलले. आकाशात ढगांची गर्दी होऊन दुपारी चार वाजता मेघगर्जनेसह अचानक पाऊस सुरू झाल. सोसाट्याचा वारा, ढगांचा कडकडाट यासह काही ठिकाणी गारपीटही झाली. या पावसामुळे आज रक्षाबंधनानिमित्त खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. जवळपास दोन तास हा पाऊस कोसळत होता.
यवतमाळ-दारव्हा मार्गावरील बोरीअरब येथील अडाण नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी तात्पुरता रपटा उभारला आहे. रविवारी अडाण नदीची पाण्याची पातळी वाढल्याने दुपारपासून हा मार्ग बंद झाला. आज या रपट्यावरून एक स्कुटी नदीत वाहून गेली. pic.twitter.com/fdJAY5338Z
— LoksattaLive (@LoksattaLive) August 19, 2024
हेही वाचा – World photography day : पालखीत कॅमेरे सजवून वाजत- गाजत काढली दिंडी…
यावर्षी जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळला. त्यामुळे जिल्ह्यातील तीन मोठे व सात मध्यम प्रकल्प भरले आहेत. दहापैकी आठ प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर सहा प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. उर्वरित प्रकल्पात पन्नास टक्क्यापेक्षा अधिक जलसाठा आहे. आणखी एक महिना कमी अधिक पावसाचा अंदाज आहे. सततच्या पावसामुळे अनेक भागात कापूस, सोयाबीन या पिकांची मोठी हानी झाली आहे. त्याचा परिणाम उत्पन्नावर होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.