चंद्रपूर : एका गरीब मजुराला ट्रॅक्टरला बांधून तीन व्यक्ती त्याला बेदम मारहाण करीत असल्याचा ‘व्हिडीओ’ समाज माध्यमावर सार्वत्रिक झाला आहे. या घटनेचा समाज माध्यमावर चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेबाबत पोलिसांमध्ये अद्याप तक्रार झालेली नाही. हा ‘व्हिडीओ’ ब्रम्हपुरी तालुक्यातील आहे. त्यामुळे पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज सोमवारी समाजमाध्यमावर एका मजूर व्यक्तीला ट्रॅक्टरला बांधून तीन व्यक्ती हाताने, बेल्टने बेदम मारहाण करीत असतानाचा ‘व्हिडीओ’ सार्वत्रिक झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. जो व्हिडीओ सार्वत्रिक झाला त्यामध्ये एका तरुण व्यक्तीला ट्रॅक्टरला बांधण्यात आले आहे. त्याला हाताने, बेल्टने मारहाण करीत आहेत. तसेच एका व्यक्तीच्या हातात कोयता असून त्याने मारण्याचा प्रयत्न आहे. तसेच हातात पेट्रोल अथवा डिझेलची छोटी कॅन दिसून येत आहे. त्या मजुरासोबत होणारा प्रकार भयावह आहे.
या व्हिडीओ बाबत अधिक माहिती घेतली असता तो व्हिडीओ ब्रम्हपुरी तालुक्यातील बेलगाव (कापरी) येथील असल्याची माहिती समोर आली आहे. जे व्यक्ती मारहाण करीत आहेत, त्यामध्ये एक माजी जि.प. सदस्य, ग्रामपंचातय सदस्य असल्याची चर्चा आहे. याबाबबत अधिकृत माहिती नाही. ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात येत आहे. तो व्यक्ती मजूर असून बीड जिल्ह्यातील आहे. पाणीपुरवठा योजनेचे काम करण्याकरिता या ठिकाणी आला असल्याची माहिती समोर आली आहे. एका मजुराला अमानुषपणे मारहाण करीत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला जात आहे. अद्याप या घटनेची तक्रार पोलिसात झालेली नाही. परंतु, सोशलमीडियावर ‘व्हायरल’ झालेल्या ‘व्हिडीओ’च्या आधारे ब्रम्हपुरी पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.