अकोला : भाजपचे माजी महानगराध्यक्ष व माजी महापौर विजय अग्रवाल यांची अकोला पश्चिम विधानसभा निवडणूक प्रमुखपदी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी नियुक्ती जाहीर केली.महानगराध्यपदावरून हटवताच विजय अग्रवाल यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील दुवा असलेल्या ७० जिल्हाध्यक्षांची बुधवारी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नवनियुक्त सर्व जिल्हाध्यक्षांनी सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करावा, अशा सूचना चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.
नवनियुक्त जिल्हाध्यक्षांमध्ये अकोला ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी किशोर मांगटे पाटील, तर महानगराध्यक्ष पदाची जबाबदारी जयंत मसने यांना देण्यात आली. महानगराध्यक्ष पद काढल्यानंतर विजय अग्रवाल यांच्यावर दुसऱ्याच दिवशी अकोला पश्चिम विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची धुरा सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे ते अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असून त्यांचे नाव चर्चेत आहे. पक्ष संघटनेचा विजय अग्रवाल यांना दीर्घअनुभव असून राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान आहे. अकोला भाजपमध्ये सर्व निवडणुकांच्या नियोजनामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते.