नागपूर : महाराष्ट्रात मंत्रीपद देताना प्रादेशिक समतोल राखला जात असे, परंतु आता बिहारप्रमाणे जातीय समतोल राखण्याला प्राधान्य दिले जात आहे, अशी टीका शिवसेनेचे (शिंदे) पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे यांनी केली. महायुती सरकाचा रविवारी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. यामध्ये ३३ कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री करण्यात आले. या विस्तारानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी आहे. नाराज आमदारांनी काल शपथविधीकडे आणि विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाकडे पाठ फिरवली.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज शोकप्रस्तावानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतर नागपूर येथील विधानभवन परिसरातून बाहेर पडताना विजय शिवतारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी मंत्रिपद न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच शिवतारे यांनी महायुती सरकारच्या तिन्ही नेत्यांवर तोफ डागली. ते म्हणाले, मला मंत्रिपद मिळाले नाही. याचे जास्त वाईट वाटत नाही. पण, महायुतीतील तिनही नेत्यांनी जी वागणूक दिली, ती अत्यंत चुकीची आहे. हे नेते साधे भेटायला देखील तयार नाहीत. मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराजी १०० टक्के आहे, अशा शब्दांत शिवतारे यांनी नाराजी व्यक्त केली. अडीच वर्षानंतर मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात येणार आहे. त्यानुसार तुम्हाला आश्वासन देण्यात आले आहे काय, अशी विचारणा केली असता ते म्हणाले, आता अडीच वर्षांनी मंत्रीपद दिले तरी मी घेणार नाही. मला मंत्रि‍पदाची गरज नाही. मला माझ्या मतदारसंघातील कामे मुख्यमंत्र्यांकडून करुन घेणे अधिक महत्त्वाचे वाटते. मंत्रि‍पदाबाबत मला राग नाही. पण दिलेल्या वागणुकीबद्दल प्रचंड राग आहे.

हेही वाचा…“परभणी हिंसेमागे आंबेडकरी नव्हे, हिंदुत्ववादी संघटना”, सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

यामध्ये कोणाचे नाव घ्यायची गरज नाही. पण एक सौजन्य असायला हवे. आम्ही कार्यकर्ते म्हणजे कोणी गुलाम नाहीत ना? नाराजीचे कारण हे आहे, की अशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत. ज्याप्रकारे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. तिन्ही नेत्यांकडून चर्चा करणे अपेक्षित होते. मात्र, ते सौजन्य सुद्धा त्यांनी दाखवले गेले नाही. ज्या प्रकारे महायुतीमध्ये असताना विरोधात उमेदवार उभे केले गेले. याबद्दल तिन्ही नेत्यांपैकी कोणीही कोणाला बोलत नाही. मंत्रीपद महत्त्वाचे नव्हते. पण माझी जी कपॅसिटी राज्याच्या विकासासाठी वापरायची गरज होती, ती आता वापरली जाणार नाही. माझे एकनाथ शिंदे यांच्याशी कोणतेही बोलणे झाले नाही. महाराष्ट्राचा बिहार झाला आहे. कारण विभागीय समतोलापेक्षा जातीय समतोलाला प्राधान्य दिले जात आहे, असे विजय शिवतारे म्हणाले.

Story img Loader