लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती : पुढचे सरकार हे काँग्रेस पक्षाचेच असणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत गेल्‍याने सध्‍या खुश असतील, पण, पुढचे दिवस फार वाईट आहेत. अजित पवारांवर ७० हजार कोटी रुपयांच्‍या घोटाळ्याचे आरोप करणारे भाजपचे नेते त्‍यांच्‍या बाजूला बसले आहेत. आता कुठल्‍या तोंडाने ते बोलतील. लोकच त्‍यांची छी-थू करीत आहेत, अशी बोचरी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी येथे केली.

काँग्रेसच्‍या जनसंवाद यात्रेच्‍या निमित्‍ताने येथील काँग्रेस भवनात आयोजित अमरावती विभागीय बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आमदार यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, माजी राज्‍यमंत्री डॉ. सुनील देशमुख आदी उपस्थित होते. अलीकडेच गृहमंत्री अमित शहा हे अजित पवार यांच्‍या खांद्यावर हात ठेवताना दिसले. कदाचित, ७० हजार कोटी रुपये कुठे ठेवले, असे अमित शहांनी त्‍यांच्‍या कानात विचारले असावे, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.

आणखी वाचा-“अजित पवारांचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने शरद पवारांनी…”, काँग्रेस नेत्याचं विधान

वडेट्टीवार म्‍हणाले, भाजपचे नेते सत्‍तेसाठी कुठल्‍या स्‍तराला जावू शकतात, हे जनेतेने आता पूर्णपणे ओळखले आहे. आंतरराष्‍ट्रीय बाजारात खताचे दर कमी झालेले असताना केंद्र सरकारने मात्र आपल्‍या देशात खतांचे दर वाढवले आहेत. पदभरतीच्‍या परीक्षेसाठी १ हजार रुपये शुल्‍क आकारले जात आहे. बेरोजगार तरूणांची लूट सुरू आहे. तलाठी भरतीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाले आहेत. प्रचंड भ्रष्‍टाचार सुरू आहे. मंत्र्यांमध्ये भ्रष्‍टाचारासाठी चढाओढ सुरू आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. आपण याप्रकरणी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशीची मागणी केली आहे, असे त्‍यांनी सांगितले.

आणखी वाचा-भाजपामध्ये येणार नाही असे जाहीर करा! मुनगंटीवारांचे वडेट्टीवार यांना आव्हान

जिगाव प्रकल्‍पाच्‍या एका कंत्राटाची मूळ अंदाजित रक्‍कम ५६५ कोटी रुपये असताना एका कंपनीला ९६६ कोटी रुपयांचे कंत्राट देण्‍यात आले आहे. सरकारी तिजोरीची प्रचंड लूट सुरू आहे, असाही आरोप वडेट्टीवार यांनी केला. विजेच्‍या इलेक्‍ट्रॉनिक मीटरच्‍या माध्‍यमातून ग्राहकांची लूट होणार आहे. वीज बिलात आपोआप १५ टक्‍क्‍यांची वाढ येणार आहे. जादा बिल आल्‍यास सुनावणी होणार नाही, थेट वीज कापली जाईल, लोकांना अंधारात रहावे लागेल, असे वडेट्टीवार म्‍हणाले. विविध पक्षातील लोक काँग्रेसमध्‍ये येण्‍यास इच्‍छूक आहेत. त्‍यांचे पदाधिकारी, कार्यकर्त्‍यांनी स्‍वागत करावे. भाजपमधूनही लोक येत आहेत. कुपनावरील लोकांना जोडण्‍याचे काम करायचे आहे, असे वडेट्टीवार म्‍हणाले.