चंद्रपूर: शेतकऱ्यांना भिकारी बोलून महायुती सरकारने त्यांना आता पूर्णपणे दुर्लक्षित केले. महायुतीचे सरकार हे बळीराजाचे नाही यावर आज शिक्कामोर्तब झाले. राज्याचे कृषिमंत्री कोकाटे यांनी अकलेचे तारे तोडले आहेत, शेतकऱ्यांची अवहेलना भिकारी म्हणून केली आहे. शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या असंवेदनशील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी कॉग्रेसचे विधीमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी हल्ली भिकारी सुध्दा एक रूपया घेत नाही, मात्र महायुती सरकारने शेतकऱ्यांना एक रूपयात पिक विमा दिला असे वक्तव्य केले. कृषी मंत्र्यांच्या या वक्तव्याने आता वादंग निर्माण झाला आहे. विरोधकांनी कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यासोबत केली अशी टिका केली आहे. शेतकरी हा प्रामाणिक, कष्टकरी आहे. मात्र कृषी मंत्री शेतकऱ्यांची थट्टा करित आहेत असाही आरोप विरोधकांनी केला आहे. कॉग्रेसचे विधीमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी तर कृषी मंत्री कोकाटे यांची थेट मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी लावून धरली आहे. आमच्या बळीराजाला भिकारी म्हणून बाजूला करणारे राज्यातील महायुतीचे सरकार आहे.शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही, पीकविमा योजनेत भ्रष्टाचार करतात आणि आता थेट शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात.
त्यामुळे राज्यातील महायुती सरकारची नियत ही या माध्यमातून समोर आली आहे. स्वाभिमानी शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या असंवेदनशील कृषी मंत्र्याची मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशीही मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच कृषी मंत्री कोकाटे यांचा जाहीर निषेध केला आहे. कृषी मंत्र्यांच्या या वक्तव्याचे सर्वत्र पडसाद पडायला सुरूवात झाली आहे. चंद्रपुरात कॉग्रेसच्या वतीने कृषी मंत्री यांचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या करित आहेत. शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे. अशा वेळी राज्याचा कृषी मंत्रीच अशा प्रकारची वक्तव्ये करित असेल तर हा प्रकार योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांना समज द्यावी असेही कॉग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांचा निषेध करतांना म्हटले आहे. आज शेतकऱ्यांना सरकारने धीर देण्याची गरज आहे. त्यांचे अश्रू पुसण्याची गरज आहे. मात्र अशाच वेळी सरकार मधील कृषी मंत्री शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यासोबत करित असेल तर इतरांकडून काय अपेक्षा करायची असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. अशा कृषी मंत्र्यांना घरी बसवावे असाही सल्ला आमदार वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.