रवींद्र जुनारकर, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सन्मानाने बोलविले नाही म्हणून महाविकास आघाडी व महायुतीत सहभागी मित्र पक्ष व स्वपक्षीय नेत्यांमध्ये रूसवे फुगवे बघायला मिळत आहे. प्रचार संपायला अवघ्या पाच दिवसांचा अवधी असतांना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार किशोर जोरगेवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदिप गिऱ्हे प्रचारापासून दूर आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. जाहीर सभा, घरोघरी गाठीभेटी, नुक्कड व प्रभाग सभा आणि मोठ मोठ्या सामाजिक गटांच्या मेळाव्यांवर उमेदवारांकडून भर दिला जात आहे. दोनशे पासून तर दोन हजार लोकांच्या बैठका, जाहीर सभा घेतल्या जात आहे. मात्र या सर्व प्रचारापासून महाविकास आघाडी व महायुतीत सहभागी मित्र पक्षाचे नेते व स्वपक्षीय नेते दूर आहेत. यात सर्वात पहिले नाव काँग्रेस नेते तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे आहे. प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, खासदार मुकूल वासनिक व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सोबत वडेट्टीवार यांनी काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी आयोजिलेल्या बैठकीला हजेरी लावली. ताई तुम्ही शंका बाळगू नका, प्रचाराला येणार असा शब्द वडेट्टीवारांनी दिला. ९ एप्रिल रोजी वडेट्टीवार गोंडपिंपरी व इतरत्र जाहीर सभा घेणारही होते. तुम्ही सेलिब्रिटी नाही, ४०० ते ५०० लोकांच्या सभा घ्या, हेलिकॅप्टर मिळणार नाही असा संदेश वडेट्टीवारांना मिळाला. याच नाराजीतून वडेट्टीवारांनी सभाच घेणे थांबविले. भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर हे देखील महायुतीचे उमेदवार मुनगंटीवारांच्या प्रचारापासून दूर आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करणे व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा या दोन कार्यक्रमाव्यतिरिक्त अहीर तिसऱ्या कार्यक्रमात दिसले नाही.

आणखी वाचा-भंडारा : जनविकास फाऊंडेशनचा काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळेंना पाठिंबा, माजी आमदार चरण वाघमारेंची भूमिका स्पष्ट

भाजपाच्या वर्तुळात याबाबत छेडले असता भाऊ होळीच्या दिवशी भय्यांना रंग लावायला आले नाही, प्रचारासाठी या असा साधा फोन देखील आला नाही, त्यामुळे अहीर प्रचारापासून दूर असल्याचे सांगितले जात आहे. महायुतीत सहभागी आमदार किशोर जोरगेवार देखील सक्रीय प्रचारात नाही. जोरगेवार यांनी प्रधानमंत्री मोदींच्या सभेला हजेरी लावली. महायुतीचे उमेदवार मुनगंटीवार व जोरगेवार यांची गुप्त भेट देखील झाली. मात्र ते प्रचारात कुठेही नाही. राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष एक दोन प्रचार सभांमध्ये महाआघाडीच्या मंचावर दिसले. मात्र प्रचाराचे व्यवस्थापन योग्य नाही, घटक पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना निमंत्रण मिळत नाही, घटक पक्षांना सोबत घेतले जात नाही, उमेदवार साधा फोन करित नाही, साहित्य व गाडी दिली नाही अशा असंख्य कारणांनी वैद्य नाराज होवून घरी बसले आहेत. प्रचारात त्यांचा उपयोग केला जात नसल्याने शेवटी वैद्य वर्धेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमर काळे यांचा प्रचार करायला जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदिप गिऱ्हे व सहकाऱ्यांचा देखील प्रचारात सहभाग नाही. गिऱ्हे उमेदवारी दाखल करण्याच्या दिवशी व काँग्रेस निरीक्षकाच्या सभेला दिसले. मात्र त्यानंतर गिऱ्हे यांनीही प्रचारातून अंग काढून घेतले आहे. आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची देखीलच तिच व्यथा आहे. काँग्रेस उमेदवार साधे चहा पाण्याला सुध्दा विचारत नाही अशी तक्रार काँग्रेस कार्यकर्त्यांचीच आहे.

आणखी वाचा-खरी शिवसेना म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंचे दिल्लीत मुजरे, हुजरे… सुषमा अंधारे यांची खोचक टीका

माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, काँग्रेसच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष ॲड. विजय बांगडे यांच्यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य प्रचाराच्या दिवसात घरी बसलेले बघायला मिळत आहेत. रिपाई खोब्रागडे गटाचे अध्यक्ष बाळू खोब्रागडे यांनी काँग्रेस उमेदवारासाठी एक सभा आयोजित केली. त्यानंतर त्यांचाही मंचावर वावर दिसत नाही. एकूणच महायुती व महाविकास आघाडीतील बहुसंख्य नेते व पदाधिकारी उमेदवारांवर नाराजी व्यक्त करून घरीच बसले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay vadettiwar hansraj ahir kishor jorgewar rajendra vaidya sandeep girhe away from election campaign rsj 74 mrj
Show comments