नागपूर : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाची २९ सप्टेंबर ला बोलावलेल्या बैठकीवर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, ओबीसींच्या भरवश्यावर सत्तेत येता ओबीसींने तुमचे काय घोडे मारले? ओबीसींच्या प्रश्नांकडे तुम्ही दुर्लक्ष करता, असा आरोप केला. ते नागपूर निवास स्थानी पत्रकार परिषदेत बोलत होते.ते म्हणाले, चंद्रपूर येथे उपोषण आंदोलन करीत असलेले रविंद्र टोंगे यांची प्रकृती गंभीर आहे. पण तसरकार समाजाचे प्रश्न सोडवायचे सोडून राजकारण करीत आहे. सकल ओबीसी समजाचा प्रश्न आहे. राज्यभर आंदोलन सुरू आहे.
मात्र सरकार आंदोलकांना बैठकीचे निमंत्रण देताना जणू भाजपची बैठक असल्याप्रमाणे त्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या त्यात भरणा आहे. शासकीय प्रतिनिधीने बैठकीचे निमंत्रण घेऊन आंदोलनस्थळी येणे अपेक्षित होते. पण सरकारने आमदारही नसलेल्या व्यक्तीकरवी बैठकीचे निमंत्रण पाठवले. तसेच ओबीसी आंदोलनात सक्रिय सहभाग असलेल्या कांग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार, नेते, पदाधिकारी यांना चर्चेचे निमंत्रण दिले नाही. ही ओबीसी समाजाची बैठक आहे की, केवळ भाजप समर्थक ओबीसी नेते, पदाधिकारी यांची बैठक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकल ओबीसींची बैठक बोलावतील काय, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला.