चंद्रपूर : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याचे समोर आल्यानंतर समाजमाध्यमांवर या घटनेची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आता यात काँग्रेस विधीमंडळ नेते तथा ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनीही उडी घेतली. त्या कुत्र्याला इतकी काय दुर्बुध्दी सुचली, कुणाला चावावे कळले नाही. याचे वाईट वाटते. त्यामुळे भिडे यांना चावणाऱ्या कुत्र्याची एसआयटी चौकशी सरकारने केली पाहिजे, अशी उपरोधिक मागणी वडेट्टीवार यांनी केली.

वडेट्टीवार आज चंद्रपुरात शासकीय विश्रामगृहावर आले असता माध्यमांशी संवाद बोलत होते. ते म्हणाले, कुत्रा हा प्रामाणिक प्राणी आहे. मात्र या प्रामाणिक प्राण्याने भिडे गुरुजी यांचा इतका का राग धरला याची देखील चौकशी झाली पाहिजे. मंगेशकर सामाजिक योगदान नाही. या वक्तव्यावर मी आजही ठाम आहे. दिवगंत लता मंगेशकर श्रेष्ठ गायिका होत्या. छान गायच्या. जनतेचा त्यांना प्रतिसाद होता. हे सर्व आम्ही मान्य करतो. मात्र सामाजिक योगदानाचे काय असाही प्रश्न उपस्थित केला. मुंबईतील पेडर रस्त्यावरच्या उड्डाणपुलाला त्यांनी वैयक्तिक कारणांसाठी विरोध केला होता. विशेष म्हणजे, तेव्हा लता मंगेशकर यांनी देश सोडण्याची धमकी दिली होती.

हे विसरता येणार नाही. विदर्भ साहित्य संघाच्या कार्यक्रमाला निःशुल्क येणाच्या कबूल केले. त्यानंतर २२ लाखांची मागणी केली. त्यामुळे तो कार्यक्रमच रद्द करावा लागला. कोल्हापूरचा भालाजी पेंढारकर यांचा स्टुडिओ कुणी हपडला हे महाराष्ट्राला माहीत आहे. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने एका महिलेचा जीव घेतला आहे. ते धर्मदाय रुग्णालय नाही तर लुटारूंचे रुग्णालय आहे, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली. चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या अंतर्गत गटबाजी राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेत आहे. जिल्ह्यातील भाजपचे दोन प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातील संघर्ष आता सर्वांनाच माहिती झाला आहे. या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार म्हणाले, जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार सध्या संघर्षाच्या मैदानात आहेत. त्यातच मुंबईतील सागर बंगल्याच्या मदतीने एक आमदार सूर्योदयाकडे आहे तर दुसरा सूर्यास्ताकडे आहे, अशा शब्दांत त्यांनी मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील अंतर्गत संघर्षावर बोट ठेवले.