लोकसत्ता टीम
नागपूर : सध्याचे सत्ताधारी पक्ष अवकाळी पावसासारखे जनसामान्यांना उदध्वस्त करणारे आहेत. काँग्रेस मात्र, नियमित होणाऱ्या पावसासारखे असून ते जनतेला सुखावणारे आहे. शरद पवार हे मूळचे गांधी विचारांचे असून अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील या त्यांच्या विधानात तथ्य आहे, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. वडेट्टीवार आज नागपूर निवासस्थानी माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या जुलमी, अत्याचारी आणि हुकूमशाही प्रवृत्तीला जनता विटलेली आहे. त्यांना बदल हवा आहे. २०२४ मध्ये सत्ता परिवर्तन होईल आणि काँग्रेससोबत अनेक पक्ष जुळतील तसेच काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी राजकीय नेते फार दूरवरचा विचार करून भाष्य करीत असतात.
शरद पवार हे मूळचे गांधी विचाराचे आहेत. गांधी विचार कोणी पुसू शकत नाही, संपवू शकत नाही. काही राजकीय पक्ष अवकाळी पावसासारखे आहेत. काँग्रेस हा नियमित पाऊस आहे. अवकाळी पावसासारखे सत्तेत आलेले पक्ष जनतेचे नुकसान करतात. ज्याप्रमाणे अवकाळी पाऊस शेती आणि जनसामान्यांना उदध्वस्त करोत. तशीच स्थिती आताच्या सत्ताधारी पक्षाची स्थिती आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
सातारा येथे ४ मे रोजी शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासभेनंतर इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी नजकीच्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असे भाकीत केले होते. तसेच त्यांनी काँग्रेस आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष हे दोघे गांधी आणि नेहरू विचारसरणीने चालणारे आहेत. मात्र, याबाबत कोणताही निर्णय सहकाऱ्यांच्या संमतीने होईल. आम्ही घाईन कोणताही निर्णय घेणार नाही, असेही पवार म्हणाले होते. याबाबत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, विद्यमान सत्ताऱ्यांच्या जुलमी, अत्याचारी आणि हुकूमशाही प्रवृत्तीला जनता विटलेली आहे.
आणखी वाचा-VIDEO : ‘नयनतारा’ला ‘भोला’ अन् ‘शिवा’ची भीती! शिकार लपवण्यासाठी ‘ति’ने काय केले, एकदा पहाच…
२०२४ च्या निवडणुकीनंतर अनेक पक्ष काँग्रेस मध्ये विलीन होतील. या पवार यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. पवार सारखे मोठे नेते जेव्हा बोलतात, ते फार दूरवरचा विचार करून बोलत असतात. २०२४ मध्ये सत्तापरिवर्तन होणार आणि त्यानंतर अनेक पक्ष काँग्रेससोबत येतील आणि काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला.