नागपूर: राज्याचे मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलनावर कठोर शब्दांत टीका केल्याने समाजात दुही निर्माण होईल, असे सांगत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भुजबळ ज्या सभेला असतील तेथे आपण जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती. काही दिवसात भूमिका बदलत हिंगोलीच्या ओबीसी एल्गार सभेला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले, पण तिकडे गेले मात्र नाही.
हिंगोलीच्या सभेला का गैरहजर राहिले अशी विचारणा केली असता ते म्हणाले, एखाद्या सभेत गेलो नाही म्हणजे भूमिका काय या संदर्भात बोलण्याची गरज नाही. एका राजकीय पक्षात मी काम करतो. मी विरोधी पक्ष नेता आहे. पक्षाचा आदेश हा महत्त्वाचा असतो. ते आज नागपुरात माध्यम प्रतिनिधीशी बोलत होते. ओबीसी समाजात चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून हिंगोलीतल्या सभेला जाणार असल्याचे म्हटले होते.
हेही वाचा… माजी मंत्री सुनील केदार आरोपी असलेल्या जिल्हा बँक घोटाळा प्रकरणाचा निकाल पुढे ढकलला
शिंदे समितीबद्दल ते म्हणाले, हा हास्यास्पद प्रकार आहे. राज्यातला एक मंत्री शिंदे समिती बरखास्त करा म्हणतो आणि सरकार त्यांचं ऐकत नाही. एकाच घरात राहणारे एकमेकांशी भांडतात असे चित्र यातून पुढे आले. समिती बरखास्त करावी की नाही करावी हे आम्ही अधिवेशनात मांडू. शिंदे समिती गठित झाले तेव्हा मंत्री म्हणून भुजबळ यांनी भूमिका स्पष्टपणे मांडायला हवी होती. त्यांच्या मागणीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किती दाद देतात हे पाहू.
अवकाळी पाऊस आणि शेतकरी
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा उरलं सुरलं जे आहे सर्व उध्वस्त झालेलं आहे, दोन तारखेपासून यवतमाळ येथून मी दौरा सुरू करणाऱ्या जालना, वाशिम चार दिवस शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन या सगळ्या परिस्थितीचे पाहणी करणार आहे. त्याच्या नुकसान भरपाई संदर्भात मागणी येणाऱ्या अधिवेशनात लावून धरणार आहे.
चाळीस तालुक्यात सोडून नव्याने एक हजार मंडळात दुष्काळ जाहीर केला. त्याला केंद्र सरकारची मदत मिळू शकत नाही.. सरकार उपसमितीची बैठक न घेतल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. राज्य सरकारच्या तिजोरीत द्यायला शेतकऱ्यांसाठी पैसे नाही. दोन ते पाच दौरा करणार आहे. हिंगोलीतील ओबीसी सभा आणि तिकडे जाण्याबाबत ते म्हणाले, त्यावर आता पडदा टाकला आहे. माझ्या पक्षाचा कार्यक्रम होता मी तिकडे गेलो होतो.