नागपूर : विधानसभा विरोधी पक्षनेते संदर्भात आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. त्यांच्याकडून यासंदर्भात सकारात्मक संकेत आल्यास पुढील पाउल टाकू, अशी माहिती काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून अद्याप खातेवाटप आणि विरोधी पक्षनेतेपदी निवड रखडली आहे. अशात काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक संकेत आल्यास विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज करू, असे म्हटले आहे. तर खातेवाटपावर बोलाताना ते म्हणाले, ‘बहुमतात सरकार येऊनही सुरुवातीला मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला. आता खातेवाटप थांबलेले आहे. कुणी किती खावे याची गोळाबेरीज सुरू असल्यामुळे अद्याप खातेवाटप झाले नसावे, असे दिसून येत आहे.
हेही वाचा – मराठी भाषिकांना फ्लॅट न देणाऱ्यांवर कारवाई करा – आदित्य ठाकरे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत जोडो यात्रेत अर्बन माओवादी असल्याचा आरोप लावला होता. त्या वक्तव्याचा समाचार घेत वडेट्टीवार म्हणाले, ‘भारत जोडो यात्रेत अर्बन माओवादी होते तर भाजप सरकारने त्यांना थांबवायला हवे होते. काल काँग्रेसच्या कार्यालयावर ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला ते देखील अर्बन माओवादी होते का, याचेही उत्तर भाजपने द्यावे.’
आरोपीला भर चौकात फाशी द्या
बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणातील आरोपीला भर चौकात फाशी देण्यात यावी. त्याकरीता केवळ एसआयटी स्थापन करून होणार नाही. न्यायाधीशामार्फत चौकशी होणे गरजेचे आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. कल्याणमधील हल्ल्यावर बोलताना ते म्हणाले, ‘हा हल्ला मराठी अस्मितेवरील हल्ला आहे. सर्व पक्षांनी एकत्र येऊन याचा बंदोबस्त करायला हवा. अशा घटनांमागे मराठी माणूस राज्यातून हद्दपार करण्याचा हेतू आहे का, याचाही शोध घ्यायला हवा.’