अमरावती : कृषी विभागातील भ्रष्टाचाराला विरोध केल्यामुळे राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांची बदली केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी केला. प्रामाणिक अधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची करण्याची या सरकारची जुनीच कार्यपद्धती असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसच्या विधानसभा पूर्वतयारी बैठकीसाठी वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते अमरावती शहरात आले. यावेळी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधीं समवेत त्यांनी संवाद साधला.
हेही वाचा >>> पटोले म्हणतात,‘महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीदासाठी …’
वडेट्टीवार म्हणाले, भ्रष्टाचार रोखला तर बदलीची शिक्षा मिळेल, असा संदेश या बदलीतून महायुतीने दिला आहे. प्रामाणिक अधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची करण्याचे काम सातत्याने आहे. कृषी विभागातील भ्रष्टाचार बोकाळला आहे. शेतकऱ्यांचे भले करण्याची या सरकारची मानसिकता नाही. शेतकरी विरोधी सरकार असल्यानेच महायुतीचा कृषी विभाग भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकला आहे. नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी वाटपाच्या १४०० कोटी रुपयांच्या प्रस्तावावर व्ही राधा यांनी आक्षेप नोंदवला होता. खतांच्या खरेदीसाठी पीएम प्रणाम’ योजनेतंर्गत मिळणारे अनुदान हे २५० कोटींपेक्षा जास्त मिळणार नसल्याने ही योजना तूर्तास राबवली जाऊ नये, असे मत त्यांचे होते. त्यांनी शेतकरी सन्मान योजनेचा निधीचा एक हप्ता वळवण्यासही विरोध केला होता. त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
हेही वाचा >>> ‘एमपीएससी’मध्ये अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा वाद; परीक्षा, निकालावर काय परिणाम होणार?
व्ही. राधा यांनी निविष्ठा खरेदीच्या प्रस्तावाचा दुसरा टप्पाही रोखला होता. फवारणी पंपाच्या खरेदीवर अनेक आक्षेप घेतला होता. ‘या अनियमितता असून चौकशी करण्याची आवश्यकता’ असल्याचा शेरा राधा यांनी संबंधित फाईलवर मारल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महायुती सरकारने व्ही. राधा यांची बदली केली आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. राज्यात एका वर्षात २३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच सर्वात जास्त आत्महत्या होत आहेत. आता कृषीमंत्री कुठे आहेत. आत्महत्यांचे चित्र दुर्दैवी असून कृषी खात्यातील वाढलेला भ्रष्टाचार राज्याला डबघाईला आणणारा आहे. कृषीमंत्री हे त्या पदावर काम करण्यास लायक नाहीत, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. महायुतीला दोन वर्षे बहीण आठवली नाही, लोकसभा निवडणुकीत जिरल्यावर आता बहीण लाडकी झाली. स्वतःच्या बहिणीला पाडण्यासाठी बायकोला विरोधात उभे करणाऱ्यांनी योजनेची घोषणा केली, अशीही टीका त्यांनी अजित पवार यांचा नामोल्लेख न करता केली.