लोकसत्ता टीम
नागपूर: राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकशाही कडून हुकुमशाही वाटचाल सुरू आहे. कायदा फक्त विरोधकांसाठी आहे. लोक मरू द्या, पण निरव मोदी सारख्या माणसाला चोर म्हणून नका तर साहेब म्हणा असे म्हणण्याची सुरुवात देशात झाली आहे, अशी उपरोधिक टीका माजी मंत्री व काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
वडेट्टीवार शनिवारी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. निरव मोदी आणि ललित मोदी यांचा अपमान केला असे भाजप म्हणत असेल तर ते भाजपच्या दृष्टीने ओबीसींचे फार मोठे नेते आहेत. ओबीसींचे नेते देशाबाहेर पळून गेल्यामुळे ओबीसी जनता दु:खी झाली. त्यामुळे त्यांना परत सन्मानाने भारतात बोलवावे. ललित आणि निरवला आम्ही आता चोर म्हणणार नाही. आम्ही आमचे नेते मानून त्यांचा स्वागत व सत्कार करू. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यामुळे सोमवारपासून देशभरात तीव्र आंदोलनाची सुरवात होणार आहे. त्या दृष्टीने बैठका घेतल्या जात आहेत. भाजपने लोकसभेत प्रवेश नाकारला, पण लोकांच्या मनातून राहुल गांधी यांना कसे काढणार? भाजपला हे अडचणीचे ठरणार असून जनता माफ करणार नाही.आम्ही आंदोलन करू, जेलभरो करू, रस्त्यावर उतरू, काळा दिवस म्हणून या दिवसाची नोंद झाल्याशिवाय राहणार नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.
आशीष देशमुख म्हणजे बिनबुडाचा लोटा
आशीष देशमुख यांनी कुठलेही विधान केले तरी त्यांना काँग्रेसकडून फारसे महत्त्व दिले जात नाही. ते इतके मोठे नाही की त्यांच्या भूमिकेवर भाष्य करावे. आशीष देशमुख म्हणजे बिनबुडाचा लोटा अशी त्यांची भूमिका आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.