चंद्रपूर: विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार विजय वडेट्टीवार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू होती. ही चर्चा मागे पडत नाही तोच भाजप मुंबई शहर अध्यक्ष तथा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार, काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार व त्यांचे कट्टर राजकीय विरोधक चिमुरचे आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांनी एकाच गाडीतून प्रवास करीत मूल एमआयडीसी येथील वडेट्टीवार यांच्या इथेनॉल फॅक्टरत बैठक घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान वडेट्टीवार यांचा राजकीय प्रवास नेमका कुठल्या दिशेने सुरू आहे याबाबत देखील राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत. विशेष म्हणजे वडेट्टीवार यांच्या इथेनॉल कारखान्याचे उद्घाटन लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार असल्याची माहिती आहे.
राज्याच्या विरोधी पक्षातील वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि भाजप मंत्री आशिष शेलार यांच्या गुप्त बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. असा अंदाज वर्तवला जात आहे की लवकरच महाराष्ट्राच्या राजकीय पटावर मोठी उलथापालथ होऊ शकते. या राजकीय घडामोडींची सुरुवात त्यावेळी झाली जेव्हा मंत्री आशिष शेलार गुढी पाडण्याच्या दिवशी ३१ मार्च रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौर्यावर होते. नागपूरहून चंद्रपूरकडे जाताना ते नागभीड येथे थांबले, जिथे आधीपासूनच भाजप चिमूर विधानसभा आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया उपस्थित होते. मात्र खरी आश्चर्याची बाब म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी स्वतःची गाडी सोडून शेलार आणि भांगडिया यांच्या (वाहन क्रमांक २६२७) गाडीत बसून त्यांच्यासोबत मूलपर्यंत प्रवास केला! या प्रवासानंतर तिन्ही नेते विजय वडेट्टीवार यांच्या मूल एमआयडीसी परिसरातील इथेनॉल प्रोजेक्ट साइटवर पोहोचले, जिथे बंद दाराआड एक दीर्घ बैठक झाली अशी माहिती व बैठकीचे फोटो समोर आले आहेत.
आता प्रश्न असा आहे की ही भेट एक योगायोग होती की राज्याच्या राजकीय समीकरणात मोठ्या बदलाची नांदी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वडेट्टीवार अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार आणि मंत्री होणार अशी जोरदार चर्चा होती. मात्र आता राजकारणात चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे विजय वडेट्टीवार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. या भेटीनंतर त्या चर्चांना अजून बळ मिळाले आहे. काही माध्यमांनी यापूर्वीच दावा केला होता की वडेट्टीवार काँग्रेसच्या नेतृत्वावर नाराज आहेत, कारण त्यांना प्रदेशाध्यक्षपद मिळाले नाही. याशिवाय, त्यांच्या राजकीय गुरूंच्या भूमिकेत असलेले अशोक चव्हाण आधीच भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे प्रश्न असा आहे — वडेट्टीवारही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भाजपत प्रवेश करणार का? राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की वडेट्टीवार भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांना मोठे बक्षीस मिळू शकते.
वडेट्टीवारांना पालकमंत्री व मंत्री हे पद ऑफर करण्यात आले आहे का? जर तसे झाले, तर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार हे निश्चित आहे! वडेट्टीवार यांनी या चर्चांना वेळोवेळी फेटाळले असले तरी आजच्या राजकारणात काहीही शक्य आहे. त्यामुळे आता वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान आता हे बघणे महत्त्वाचे ठरेल की ही बैठक केवळ एक योगायोग होता की सत्तासमीकरणात मोठे नाट्य घडणार आहे? या राजकीय नाट्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे एकूण पाच आमदार आहेत. तर काँग्रेसचे वडेट्टीवार एकमेव आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपच्या या पाच आमदाराना हा राजकीय बदल पटणार काय हे देखील बघितलं जाईल. या जिल्ह्यात भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार या घडामोडींकडे कशा पद्धतीने बघतात याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री जानेवारी महिन्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा. सा. कन्नमवार यांच्या शतकोत्तर रजत जयंती समारोहाला चंद्रपुरात आले होते. तेव्हा भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी वडेट्टीवार व त्यांच्यातील फोन वर झालेले खासगी संभाषण सार्वत्रिक केले होते. तेव्हाही भाजप आमदारांनी वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत भाषणातून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समोर दिले होते. तीच घडामोड आता तर होत नाही ना अशीही चर्चा आहे. दरम्यान लवकरच मुख्यमंत्री फडणवीस हे वडेट्टीवार यांच्या मूल एमआयडीसी येथील इथेनॉल कारखान्याचे उद्घाटन करणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यासाठी मूल येथे हेलिपॅड पासून सर्व व्यवस्था आतापासून केली जात आहे.