नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पणाला गैरहजर राहिले. त्यापूर्वी ते त्यांचे वडिलोपार्जित गावातील शेतावर गेले. त्यांच्या हेलिकॉप्टरला इमरजन्सी लँडिग करावे लागेल. त्यांच्या अपरोक्ष उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी ‘वॉर रुम’मध्ये बैठक घेतली. या सर्व घडामोडीनंतर शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते यांनी मुख्यमंत्र्यांची प्रकृती बरी नसल्याचे माध्यमांना सांगितले. त्या पाठोपाठ मुख्यमंत्री कार्यालयाने शिंदे यांची प्रकृतीला काहीही झालेले नाही, असे स्पष्टीकरण दिले. यामुळे मुख्यमंत्र्यांना नेमके काय झाले, असा प्रश्न विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना उपस्थित केला आहे.
वडेट्टीवार म्हणाले, खरं तर मुख्यमंत्र्यांनी स्वत: त्यांच्या प्रकृतीबाबत खुलासा केला पाहिजे अशी महाराष्ट्रतील जनतेची इच्छा आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या प्रकृतीबाबत जनतेला काळजी आहे. त्यांचे प्रवक्ते म्हणतात शिंदे यांना रुग्णालयात दाखल करावे लागेल तर दुसरीकडे त्यांचे कार्यालय (सीएमओ) सांगते की रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. तर आमचा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांवर कोणाचा आणि कशासाठी दबाब आहे, की ज्यामुळे त्याची प्रकृती बिघडत आहे. या सगळ्या गोष्टीचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे.