चंद्रपूर: “राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड भांबावले आहेत, ते पागलासारखे झाले आहेत”, अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आव्हाड यांचा समाचार घेतला. नागपूर येथील अधिवेशनात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील विरोधी पक्ष काँग्रेसला विकास निधीच्या स्वरुपात श्रीखंडपुरी मिळाली असा आरोप केला होता. या आरोपाबद्दल राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना छेडले असता, आमदार आव्हाड भांबावले आहेत, पागलसारखे करत आहेत, अशा शब्दात उत्तरे दिली.
हेही वाचा – “सरकारने सोलार इंडस्ट्रीज स्फोटप्रकरणी चर्चा टाळली”, बाळासाहेब थोरात यांचा आरोप
आम्ही काही कोणाच्या दालनात जावून पैसे मागितले नाहीत. विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांना निधी मिळाला. कमी अधिक निधी सर्वांनाच मिळाला आहे. आम्हाला निधी मिळाला तसाच निधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही मिळाला. त्यांना आव्हाड काहीच बोलले नाही. राजेश टोपे यांनाही निधी मिळाला. तेव्हा आव्हाड यांनी आपल्या माणसांना बोलायला पाहिजे. आमच्यावरच टीका का करता. राष्ट्रवादीच्या आमदारांनी निधीसाठी प्रस्ताव पाठविला तसा आम्हीदेखील पाठविला होता. पूर्वीही असेच व्हायचे. आव्हाडांच्या डोक्यात काय घुसले आहे हे आम्हाला माहिती नाही. जितेंद्र आव्हाड व मुख्यमंत्री शिंदे यांचे मतदारसंघ लागून आहेत. त्यांचे आपसात काय आहे आम्हाला माहिती नाही. त्यांनी हा राग शिंदे यांच्यावर काढावा, असेही वडेट्टीवार म्हणाले.