चंद्रपूर : पूर्णत: अपयशी ठरलेली अमृत पाणीपुरवठा योजना चंद्रपूरच्या जनतेसाठी विषप्रयोग ठरली आहे. या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून भ्रष्टाचार करणाऱ्यांची नावे लवकरच जाहीर करणार असल्याचा इशारा माजी पालकमंत्री तथा ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला. याचबरोबर, बारा गावातील लोकांचा विरोध असल्याने रद्द झालेली अंबुजा सिमेंट कंपनीची जनसुनावणी पुन्हा घ्यावी यासाठी पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, पर्यावरण सचिव तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार केल्याची माहिती त्यांनी दिली.
विश्रामभवनात आयोजित पत्रपरिषदेत वडेट्टीवार म्हणाले की, अमृत पाणीपुरवठा योजना चंद्रपूरकरांसाठी ‘अमृत’ नव्हे तर ‘विषप्रयोग’ ठरली आहे. बहुसंख्य प्रभागात अमृतचे पाणी पोहोचलेच नाही. माजी नगरसेवक उपोषण करीत आहेत. ही जनतेची फसवणूक आहे. या योजनेच्या माध्यमातून काहींनी स्वत:ची पाठ थोपाटून घेतली, परंतु योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांमधील कोणी किती टक्केवारी घेतली हे नावानिशी जाहीर करणार आहे. या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून मुख्यमंत्री यांना पत्र देणार आहे. महापालिका पाणीपुरवठा योजनेचे खासगीकरण करून प्रशासक पालिकेला लुटत आहे. योजनेचे खासगीकरण न करता त्याची सखोल चौकशी करावी, असे वडेट्टीवार यांनी सुचवले.
हेही वाचा – धक्कादायक! मुलासाठी एका महिन्याच्या चिमुकलीचा घेतला जीव; आई-वडील, आजीआजोबा अटकेत
अंबुजा सिमेंट कंपनीला आर्थिक देवाणघेवाणीतून पर्यावरण परवानगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. अंबुजा सिमेंट जनसुनावणी रद्द झाली होती. व्यवस्थापनाने त्याच सुनावणीच्या आधारे पर्यावरण परवानगीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ग्रामस्थांचा विरोध पाहता पुन्हा जनसुनावणी घ्यावी, असे पत्र प्रदूषण नियंत्रण विभाग, जिल्हाधिकारी यांना दिले आहे. अंबुजाविरोधात वेळ पडल्यास आंदोलन करणार असेही त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून माहिती देणार आहे. जनसुनावणीला स्थानिकांचा विरोध आहे, स्थानिक जिल्हा प्रशासनाने ही बाब लक्षात घ्यावी, असेही वडेट्टीवार म्हणाले.
भाजपाचा ‘डीएनए’ ओबीसी कसा?
आरक्षण संपवण्याचा घाट घालणाऱ्या भाजपाचा ‘डीएनए’ ओबीसी कसा, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ओबीसींच्या परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सुरू केली होती. भाजपाने ओबीसींसाठी काहीच केले नाही. त्यामुळे भाजपाचा ‘डीएनए’ ओबीसी असू शकतो का, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. काँग्रेस १५ जुलैपासून लोकसभा निवडणुकीची तयारी करणार आहे. चंद्रपूर लोकसभेसाठी पोटनिवडणूक होणार नाही, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. देशाचे पंतप्रधान अमेरिकेत जातात पण मणिपूरमध्ये जात नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
‘ते’ पटोलेंनाच विचारा
चंद्रपूरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे की प्रकाश देवतळे, असा प्रश्न विचारताच वडेट्टीवार यांनी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाच हा प्रश्न विचारा. प्रदेशाध्यक्ष मला भेटल्यानंतर मीदेखील त्यांना हाच प्रश्न करणार आहे, असे त्यांनी सांगितले.