नागपूर : काही पदांसाठी कंत्राटी भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले, त्याचे शुल्क प्रति परीक्षा एक हजार रुपये घेण्यात आले. काही उमेदवारांनी पाच पदांसाठी पाच अर्ज केले, त्यांच्याकडून पाच हजार घेण्यात आले होते, आता ती रक्कम उमेदवाराला तातडीने परत करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
हेही वाचा – कंत्राटी नोकर भरती प्रकरणावरून विरोधी पक्षनेत्यांची टीका, “पापावर पांघरूण घालण्यासाठी…”
विद्यमान सरकारने चपराशी पासून ते अभियंतापर्यंतचे पद कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी जी.आर.मध्ये दुरुस्ती केली. ६ सप्टेंबर २०२३ रोजी महसूल विभागात तीन हजार, कृषी विभागात दोन हजार, पोलीस विभागात तीन हजार आणि आरोग्य विभागात तीन हजार पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा जी.आर. काढला. जेव्हा ही जाहिरात प्रकाशित झाली. विरोधी पक्षाने यास विरोध केला आणि राज्यभरातील युवक रस्त्यावर आले. त्यामुळे सरकार हादरले आणि अखेर कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घेतला. फडणवीस यांचा दावा आहे की, मागील सरकारने निर्णय घेतला, पण हे सरकार बदल्यांचे धोरण बदल होते. त्यांनी हे धोरण बदलले नाही कारण, त्या पापात विद्यमान सरकार सहभागी आहे. आता भरती रद्द झाली. सरकारने परीक्षा शुल्क परत केले पाहिजे. तसेच युवकांनी कंत्राटी भरती रद्द झाल्याचा विजयोत्सव साजरा करावा, असेही आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.