चंद्रपूर : राज्यात विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तूर, द्राक्ष, कांदा, भाजीपाला अशा पिकांचे नुकसान झाले आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी कृषीमंत्र्यांची भाषा ही असंवेदनशील असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.हाताशी आलेले पिक गेल्याने बळीराजा अडचणीत असताना त्यांना समजून घेण्याऐवजी महायुतीच्या मंत्र्यांची भाषा अरेरावीची आहे.

बहुमत मिळाल्याने कोणी आमचे वाकडे करू शकणार नाही असेच या मंत्र्यांना वाटत असल्याने शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडलं आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ दे, त्यांचे नुकसान होऊ दे महायुती सरकारला सामान्य जनता, शेतकऱ्यांशी देणेघेणे नाही असे वडेट्टीवार म्हणाले. राज्यात अवकाळी पाऊस झाल्याने पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत केली पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैसे अँडव्हान्स भरले नाही म्हणून मृत्यू झाल्याप्रकरणी सरकारने आता चौकशीचे आदेश दिले आहेत. ही चौकशी म्हणजे पळवाट असल्याची टीका विधीमंडळ नेते वडेट्टीवर यांनी केली आहे. या रुग्णालयाला एक रुपयात जमीन ही रुग्णसेवीसाठी दिली आहे अस असताना सत्ताधारी आमदाराच्या पीएच्या बायकोचा मृत्यू होतो, याप्रकरणी संबंधितावर गुन्हे दाखल केले पाहिजे अशी मागणी वडेट्टीवर यांनी केली.

दहा लाख रुपयाची पावती हा पुरावा असताना आता चौकशी लावणे हे सरकारचे ढोंग आहे. कुणाला वाचवण्यासाठी सरकारने ही समिती नेमली आहे? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. मंगेशकर रुग्णालयात जर रुग्णांना योग्य सेवा मिळत नसेल तर त्यांना दिलेली जमीन रद्द करा. मॅनेजमेंटच्या इशाऱ्याशिवाय रुग्णांना इतकी वाईट वागणूक मिळूच शकत नाही, त्यामुळे या प्रकरणी संबंधितावर गुन्हे दाखल करून कारवाईची करण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली आहे.