Nagpur Breaking News Update Today : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबची कबर हटवण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास दोन गटात संघर्ष पेटला. जवळपास चार तास महाल , चिटणीस पार्क परिसरासह अन्य ठिकाणी तुफान दगडफेक, तोडफोड, रस्त्यावर जाळपोळ आणि नारेबाजी करण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केले. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे पोलिसांना अश्रु धुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या तर लाठीमार सुद्धा करावा लागला. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची असामाजिक तत्त्वांची धरपकड सुरू होती.

यानंतर आता राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. यातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा आरोप केला आहे. नागपूरच्या दंगलीनंतर विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. यासाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

नागपुरात झालेली घटना दुर्दैवी आहे. दोन समाजामध्ये तणाव आणि दगडफेक झाली. नागपूर सारख्या शहराला कुणाची तरी नजर लागली, असे म्हणावे लागेल. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन नागपूर शांत करण्याचा प्रयत्न केला. पण मुळात या घटनेसाठी जबाबदार कोण? शांत असलेल्या नागपूरला अशांत करण्याचे काम कोणी केले याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. गेले चार महिने सत्तेतील एक मंत्री दोन समाजामध्ये दरी निर्माण करेल असे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे त्या मंत्र्यांला वेळीच आवर घालण्याची आवश्यकता होती. कबरीचा वाद जाणूनबुजून निर्माण करण्यात आला. इतिहास तोडून मोडून पुढे आणण्याचे काम केलं गेलं. ४०० वर्षापूर्वीच्या कबरीच्या प्रश्नातून काय साध्य होणार आहे. ती कबर ठेवली काय आणि नाही त्यामध्ये कुणाचा फायदा होणार आहे. यासाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.