नागपूर: दहशतवाद्यांनी पहिल्यांदाच काश्मीरात धर्म विचारून गोळीबार केला. सरकार आपले अपयश लपवण्यासाठी यासंदर्भातील माझे वक्तव्यांची मोडतोड करून मांडणी करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे विधीमंडळ पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूर विमानतळावर माध्यम प्रतिनिधीशी बोलताना केला.
वडेट्टीवार यांच्या वक्तव्याने सोमवारी वादळ उठले होते. भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्याकडे वडेट्टीवार यांचे लक्ष वेधण्यात आले असता ते म्हणाले, नितेश राणे यांनी काय म्हटले. त्याकडे मला लक्ष देण्याची गरज नाही. काल मी जे बोललो ते मोडून तोडून दाखवण्यात आले. भारताला आपापसात लढवण्याचे षड्यंत्र पाकिस्ताने रचले आहे. देशांमध्ये कट कारस्थान रचण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जी भूमिका मांडली ती आमच्या पक्षाची भूमिका आहे.
काल मी म्हणलो की, दहशतवाद्यांना पहिल्यांदा एवढा वेळ मिळाला, त्यांनी धर्म विचारून गोळीबार केला. तेवढेच दाखवण्यात येते आहे. वृत्त वाहिन्यांनी माझे संपूर्ण वक्तव्य दाखले पाहिजे. पाकिस्तानने दहशतवद्यांना शिकवून पाठवले आहे. देशात यादवी व्हावी म्हणून धर्म विचारून पर्यटकांना मारण्यात आले.
देशाच्या सार्वभौमतेला, अखंडतेला खिंडार पाडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे त्यांनी असा कट रचला. अतिरेक्याला कुठला धर्म नसतो असे मी म्हटले आहे. हा भारताला कमजोर करण्यासाठी हल्ला होता. २६ वर्षानंतर पर्यटकांवर झालेला हल्ला आहे हे अपयश लपवण्यासाठी माझे बोलणे मोडून-तोडून दाखवले गेले, असा आरोपी वडेट्टीवार यांनी केला.
पीडितांच्या कुटुंबीयांची माफी
या हल्ल्यात ज्या निष्पाप लोकांचा बळी गेला. माझ्या बोलण्याने त्यांच्या भावना दुखावल्या असतील, कुटुंबांना वेदना झाला असेल तर मी माफी मागतो, असे वडेट्टीवार म्हणाले. प्रसिद्ध माध्यमांना माझी विनंती आहे. माझे वक्तव्य पूर्ण दाखवा, अर्धवट वक्तव्य दाखवून सरकारचे अपयश लपवू नका. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ नये, माझी भूमिका स्पष्ट आहे. दहशतवादी धर्म विचारतात, त्यांच्याकडून दोन धर्मात भांडण लावले जाते हे पहिल्यांदा होत आहे, असेही ते म्हणाले.
शिक्षक भरती घोटाळा
शिक्षक भरती घोटाळ्याच्या तपासात ईडीच्या प्रवेशाची वृत्त वाचले. या प्रकरणाची उच्चस्तरीय न्यायालयीन समिती नेमून चौकशी झाली पाहिजे. केवळ एकाला अटक करून ही चौकशी होणार नाही. यात दोषी आहेत त्या सर्वांवर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.