नागपूर : भाजप सरकारने औरंगजेबच्या कबरीसाठी निधी दिला आणि आता मुख्य विषयापासून लक्ष विचलित करण्यासाठी हे विषय उचलत आहे. धार्मिक विद्वेष निर्माण करून भेद करून मत मिळवण्याचे सत्ताधाऱ्यांचे उद्योग आहेत, अशी टीका काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ते आज नागपूर निवासस्थानी एका वृत्तसंस्थेशी बोलत होते. शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी मुघल सम्राट औरंगजेबाची कबर पाडण्याच्या आवाहन केले होते. त्यासंदर्भात त्यांना विचारले असता, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली.

 ते म्हणाले, म्हस्के यांनी वक्तव्य करून काही उपयोग नाही, भाजप सत्तेत आल्यानंतर औरंगजेबाच्या कबरीलाही निधी मिळाला होता. त्यावेळी ते कुठे होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराला औरंगजेबाच्या कबरीपेक्षा कमी निधी मिळाला. औरंगजेबाची कबर ही ४००-५०० वर्षे जुनी आहे. तो हेरिटेजचा विषय आहे. पण, तो आता या जुन्या बाबी उकरून काढण्याची आवश्यकता काय आहे. याचाच अर्थ त्यांच्याकडे लोकांना दाखवण्यासारखे काही काम नाही. विकास कामे केली नाही. लोकांना दिलेली आश्वासनांची पूर्तता करता आलेली नाही. त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीवर बोलून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना औरंगजेबाच्या नाव घेऊन धर्माधता पसवायची आणि मत घ्यायचे आहेत. पण, जनता हुशार आहे, एक दिवस त्यांना जनता नक्कीच धडा शिकवेल, असेही वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, भारतीय वारशांचे अधिक प्रमाणात जतन करण्यासाठी ब्रिटिश आणि मुघल प्रतिकांपासून देशाला मुक्त करावे तसेच क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर नष्ट करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली होती.पारतंत्र्य आणि क्रूरतेची निशाणी असलेल्या मुघल आणि ब्रिटिशांच्या वारशांचे आपण गेली ७५ वर्ष ‘ऐतिहासिक’ या गोंडस नावाखाली जतन करत आलो आहोत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एसआय) च्या संरक्षणाखाली ३,६९१ स्मारके आहेत. परंतु यापैकी २५ टक्के स्मारकांना कोणतेही राष्ट्रीय किंवा सांस्कृतिक महत्त्व नाही.  भारतीय वारशांचे अधिक प्रमाणात जतन करण्यासाठी ब्रिटिश आणि मुघल प्रतिकांपासून देशाला मुक्त करावे, अशी मागणी म्हस्के यांनी केली.

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आपण ऐतिहासिक वारशांचे रक्षण करण्याच्या नावाखाली वसाहतवादी भूतकाळाचे ओझे वाहून नेत आहोत. या संरक्षित स्मारकांमध्ये ब्रिटीश सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या ७५ कबरी आहे. ज्यांचा भारताच्या सभ्यता आणि संस्कृतीशी काहीही संबंध नाही. भारताला गुलाम बनवणाऱ्या आणि आपल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांवर अत्याचार करणाऱ्यांच्या आठवणी आपण आपला वारसा म्हणून जपतो आहोत हे योग्य आहे का? असा सवाल त्यांनी केला होता.

Story img Loader