नागपूर : काँग्रेस सरकारमध्ये असताना क आणि ड श्रेणीतील पदांसाठी तात्पुरती भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, नंतरच्या काळात ब श्रेणीतील पदाची भरतीदेखील कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेतला गेला, त्यावेळी जे वित्तमंत्री आणि कामगार मंत्री होते तेच आज शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यामुळे भाजप कंत्राटी भरतीच्या निर्णयाचे भागीदार आहेत, असे प्रतिउत्तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेतून दिले.
फडणवीस मागील सरकारला कंत्राटी नोकर भारतीचा दोष लावत आहेत. त्यावेळी विरोधी पक्षनेते कोणे होते, ते गप्प का बसले, त्यांनी विरोध का केला नाही, शिंदे-फडणवीस सरकारने मागील सरकारचा कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करण्यास दीड वर्षे का लावले, कंत्राटी भरतीसाठी नेमलेल्या नऊ कंपन्या कोणाच्या आहेत, दोन वर्षांपूर्वीची निविदा शिंदे-फडणवीस सरकारने आता अंतिम का केली, असे प्रश्न करून भाजपाचे उद्याचे आंदोलन म्हणजे पापाचे भागीदार असलेले आपल्या पापावर पांघरूण घालण्यासाठी नौटंकी आंदोलन करीत आहेत, अशी टीका त्यांनी केली.