चंद्रपूर : न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द करण्याचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार? सत्ता आहे, आम्ही काहीही करू, अशीच भूमिका या सरकारची राहणार का? असे प्रश्न काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केले आहे.

मानहानी प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी २४ तासांत रद्द करण्यात आली. सुनील केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी २४ तासांत त्यांची आमदारकी रद्द केली. आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्दचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार आहे? धनंजय मुंडे यांच्यावर आरोप सिद्ध झालेले नाहीत, म्हणून राजीनामा घेऊ शकत नाही, असे म्हणणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अद्यापही कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा का घेतलेला नाही? त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले, न्यायालयाने शिक्षा सुनावली, तरी त्यांचा राजीनामा घेतला गेला नाही! सत्ता आहे म्हणून आम्ही करू तो न्याय आणि आम्ही देऊ तो दंड, ही सत्तेची मस्ती नाही तर आणखी काय? अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका बनावट दस्तावेज देऊन लाटल्याच्या प्रकरणात राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षाचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या निकालाने कृषिमंत्री यांची आमदारकी व मंत्रिपदही धोक्यात आले आहे. कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून म्हणजे मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात सदनिका उपलब्ध केली जाते. त्यासाठी संबंधिताला आपल्या नावावर कुठेही सदनिका नसल्याचे प्रतिज्ञापत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात.

ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी १९९५ मध्ये अशी कागदपत्रे सादर करून शहरातील कॅनडा कॉर्नर भागातील एका अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून दोन सदनिका प्राप्त केल्या. इतकेच नव्हे तर, या इमारतीतील अन्य दोन सदनिका इतरांनी मिळवल्या, त्याचा वापर कोकाटे बंधूंकडून केला जात होता. या संदर्भात तक्रारी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी जमीन(कमाल मर्यादा विनियमन) विभागाचे तत्कालीन विश्वनाथ पाटील यांनी ॲड. माणिक कोकाटे, त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यासह एकूण चार जणांविरुद्ध बनावट दस्तावेजाच्या आधारे सदनिका मिळवत शासनाची फसवणूक केल्याबाबत तक्रार दिली होती. त्यावरून चार जणांविरुध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Story img Loader