नागपूर : न्या. संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील समिती मराठा समाजातील कुणबी जातीच्या नोंदी शोधत आहे. याबाबत राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. राज्य सरकारने मराठावाड्यातील मराठा समाजातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी समिती स्थापन केली. परंतु जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आणि त्यासाठी आंदोलन केले.
हेही वाचा >>> तांदळावर अतिरिक्त कर; सुमारे ५० हजार मजूर बेरोजगार
मराठवाड्याच्या व्यतिरिक्त इतर विभागातील अशा नोंदी शोधणे हे ओबीसींवर अन्याय करणारे आहे, असे पत्रात नमुद केले आहे. सद्यस्थितीत ओबीसीत ३७२ जाती येतात. या जातीची व्यक्ती वा कुटुंबातील सदस्यांनाही १९६७ पूर्वीच्या पुराव्याच्या नोंदी शोधताना मानसिक व आर्थिक त्रास होतो. हे लक्षात घेता कुणबी नोंदी शोधतानाच ओबीसींच्या नोंदी शोधून त्याची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे.