चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी
चंद्रपूर जिल्ह्य़ातील शेतकरी अत्यल्प पावसामुळे संकटात असून, या जिल्ह्य़ाला दुष्काळग्रस्त घोषित करण्यासह विविध मागण्यांकरिता ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी विधानसभेच्या पायऱ्यांवर आमरण उपोषण सुरू केले.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्य़ातील सावली, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, नागभीड, मूल, पोंभुर्णा, चिमूर, गोंडपिपरी या तालुक्यात धानाचे पीक घेण्यात येते. यंदा १ लाख ६९ हजार ८६८ हेक्टरवर धान, १ लाख ४८ हजार २२७ हेक्टरवर कापूस, ८७ हजार ६०१ हेक्टरवर सोयाबीन, ३३ हजार ६८३ हेक्टरवर तूर पिकांची लागवड केल्या गेली. सुरवातीला चांगला पाऊस पडला असला तरी कधी जास्त तर कधी पाऊस न पडल्याने दुबार- तिबार पेरणी केली जाते. परंतु विविध कारणाने शेतकऱ्यांना योग्य पीक हाती आलेच नाही. जिल्ह्य़ात कमी पाऊस पडल्याने १९७२ सालाहून तीव्र भीषण दुष्काळाची चिन्हे दिसत आहेत. परंतु शासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही.
शासनाने चंद्रपूरकरांना न्याय देण्याकरिता संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शंभर वर्षे जुनी ब्रिटीश कालीन आणेवारी व उंबरठा काढण्याचे निकष बदलवावे, सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ स्थापन करावे, ब्रम्हपुरी येथे एमआयडीसी मंजूर करावी, सिंदेवाही येथे नगरपंचायत मंजूर करावी, ब्रम्हपुरी आणि सिंदेवाही येथील प्रशासकीय नवीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी निधीसह प्रशासकीय मान्यता द्यावी, ब्रम्हपुरी येथील १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी निधीसह प्रशासकीय मान्यता द्यावी, ब्रम्हपुरी येथे अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी वसतिगृहाचे बांधकाम करण्यासाठी निधीसह प्रशासकीय मान्यता द्यावी यासह विविध मागण्या त्यांनी लावून धरल्या.
मागण्या मान्य होईस्तोवर उपोषण मागे घेणार नसून, प्रसंगी येथेच रात्र काढण्याची तयारी त्यांनी दर्शवली. याप्रसंगी विजय वडेट्टीवार यांची राज्यातील अनेक भागातील आमदारांनी भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा