चंद्रपूर : नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या विक्रमी विजयानंतर सत्कार सोहळे सुरू झाले आहेत. मात्र, या सत्कार सोहळ्यांपासून राज्याचे विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांना दूर ठेवले जात आहे. किंबहुना वडेट्टीवार यांना मुद्दाम निमंत्रित केले जात नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या घटनाक्रमामुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत धुसफूस पुन्हा सुरू झाली आहे.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार धानोरकर यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा २ लाख ६० हजार मतांनी पराभव केला. या विक्रमी यशानंतर खासदार धानोरकर यांचे सत्कार सोहळे सर्वत्र सुरू झाले आहेत. बल्लारपूर काँग्रेस समितीच्या वतीने ११ तर राजुरा काँग्रेस समितीच्या वतीने १२ जून रोजी धानोरकर यांचा सत्कार सोहळा झाला. या दोन्ही सत्कार सोहळ्याला जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाष धोटे, आमदार सुधाकर अडबाले तथा जिल्ह्यातील काँग्रेसचे अन्य नेते उपस्थित होते. मात्र, या दोन्ही सत्कार सोहळ्यांपासून राज्याचे विरोधी पक्षनेेते आमदार विजय वडेट्टीवार यांना दूर ठेवण्यात आले. विशेष म्हणजे, वडेट्टीवार यांना दोन्ही सत्कार सोहळ्याला निमंत्रित देखील केले नव्हते. वडेट्टीवार यांनी खासदार धानोरकर यांच्याऐवजी प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव तथा स्वत:ची मुलगी शिवानी वडेट्टीवार हिला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती. शिवानी हिला उमेदवारी देण्यास पक्षश्रेष्ठी तयार नसल्याचे वडेट्टीवार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांचे नाव समोर केले होते. काँग्रेस श्रेष्ठींनी वडेट्टीवार यांना एक तर तुम्ही लोकसभा लढा अन्यथा धानोरकर यांना उमेदवारी द्या, असे स्पष्ट सांगितले होते. वडेट्टीवार यांनी माघार घेतल्यानंतरच धानोरकर यांना उमेदवारी मिळाली. आता धानोरकर विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्यानंनतर राजुरा येथील सत्कार सोहळ्यात जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांना धानोरकर यांना उमेदवारी मिळू नये, तसेच माझ्या पराभवासाठी जिल्ह्यातीलच काँग्रेस नेत्याने सुपारी दिल्याचा आरोप केला. धानोरकर यांनी हा आरोप करताना कुणाचे नाव घेतले नसले तरी वडेट्टीवार यांच्यावर हे टीकास्त्र होते. धानोरकर यांच्या या टीकेमध्येच सत्कार सोहळ्यांपासून वडेट्टीवार यांना मुद्दाम दूर ठेवले जात असल्याचे उत्तर आहे. विशेष म्हणजे, धानोरकर यांनी आता गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील नाही तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील आमदार मंत्री होणार, आमदार सुभाष धोटे यांना मंत्री करणार असेही सांगून टाकले. या सर्व घटनाक्रमातून राज्याचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांना सत्कार सोहळ्यापासून दूर ठेवले जात असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा >>>अमरावती : दुधात गुरांच्या हौदातील पाण्याची भेसळ! सीसीटीव्ही कॅमेरामुळे प्रकार उजेडात
ओबीसी महासंघाच्या सत्कार सोहळ्यातूनही डावलले
राष्ट्रीय ओबीसी महासंघाने २२ जून रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. दुपारी बारा वाजता आयोजित या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आहेत. प्रमुख पाहुणे आमदार सुधाकर अडबाले, आमदार अभिजित वंजारी आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार राज्यात ओबीसींची बाजू ठामपणे लावून धरत आहेत. मराठा आंदोलनाच्या वेळीही वडेट्टीवार यांनीच ओबीसींची बाजू मांडली होती. मात्र, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यातून देखील ओबीसींचे नेते तथा विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांना डावलण्यात आले आहे.
धानोरकर यांच्याकडून वडेट्टीवार लक्ष्य
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. काही वेळा नाव घेऊन टीका केली तर काही प्रसंगी नाव न घेता टीका केली आहे. लोकसभेची उमेदवारी मिळण्यापूर्वी पती दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या मृत्युला काँग्रेस नेते जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता पराभवासाठी व लोकसभेची उमेदवारी मिळू नये म्हणून काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी सुपारी देण्याचा प्रयत्न झाला. पैसे देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न केला गेला असा आरोप केला. तर काही वर्षांपूर्वी शकुंतला लॉन येथे आयोजित एका कार्यक्रमात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या समक्ष जिह्यातील काँग्रेस नेते मंत्री मंडळातील नेत्यांना जिल्ह्यात येण्यापासून रोखतात असाही आरोप केला होता.