नागपुर: शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड़ यांनी कांग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार संतप्त प्रतिक्रिया दिली असून ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती आली आहे’ अशी टीका त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानाने चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. अलीकडेच त्यांनी त्यांच्या सुरक्षा रक्षकाकडूनच वाहन स्वच्छ करून घेतले होते. त्यापूर्वी मुलाच्या वाढदिवसाला तलवारीने केक कापला होता. आता काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखाचे बक्षीस देणार ” असे ते म्हणाले. याच्या तीव्र प्रतिक्रिया कॉंग्रस वर्तुळात उमटल्या आहेत. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायकवाड़ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. असे न केल्यास धडा शिकवणार असा इशाराही दिला आहे. संजय गायकवाड त्यांच्या क्षमतेबाहेर बोलत आहेत. राहुल गांधी यांचे नाव घेण्याची त्यांची लायकी नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत गायकवाड आणि त्यांचा पक्ष कुठे असेल हे दिसून येईल. त्याचा माज जनताच उतरवेल, असे वडेट्टीवार म्हणाले.
हेही वाचा >>>शरद पवारांचे एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र; सरकारला इशारा देत म्हणाले…
यापूर्वीही वडेट्टीवार यांनी गायकवाड यांचा खरपूस समाचार घेतला होता. तलवारीने केक कापताना गायकवाड यांचा व्हीडीयो ट्विटरवर पोस्ट करीत सत्ताचा माज काय असतो याचे जाहीर प्रदर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा एक आमदार वारंवार करीत आहे.,असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे. साधारणपणे तलवारीचे असे प्रदर्शन आणि वापर अशा प्रकारे नियमानुसार करता येत नाही. पण आपल्या पाठिंब्यामुळे झालेले मुख्यमंत्री असल्याने वाट्टेल तो माज करायला आणि मिरवायला आमदारांना सूट मिळाली आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली होती.
राहुल गांधी यांचे आरक्षणाबाबतचे वक्तव्य अर्धवट सांगून महायुतीचे नेते लोकांची दिशाभूल करीत असल्याची टीका यापूर्वीही काँग्रेस नेत्यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपने आंदोलन केले होते. पण आक्षेपार्ह भाषेचा वापर टाळला होता. मात्र शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मात्र नेहमीप्रमाणे वादग्रस्त वक्तव्य केले.