गडचिरोली : काँग्रेस पक्षात लहान मोठे न बघता प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी दिली जाते. विधानसभेच्या उमेदवारीसंदर्भात देखील हेच निकष वापरले गेले. परंतु भाजपने याला जातीचा रंग देत कुणबी, तेलींपासून काँग्रेसला वाचवा, असा अपप्रचार चालू केला आहे. संविधानविरोधी भाजपकडून हेच अपेक्षित असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. काँग्रेसच्या मेळाव्यानिमित्त गडचिरोलीत आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

वडेट्टीवार पुढे म्हणाले की, महायुतीच्या कारभाराला जनता वैतागली आहे. निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन नको त्या योजना राबवून राज्याला कर्जबाजारी केले. बेरोजगाराला वाऱ्यावर सोडून शेतकऱ्यांना फासावर लटकवले. रोजगाराचे आश्वासन देत कंत्राटी भरती करून लाखो तरुणांच्या आशेवर पाणी फेरले. राज्यात आणि गृहमंत्र्यांच्या शहरात कायदा सुव्यवस्थेचे  धिंडवडे निघत आहे. महिलांवरील अत्याचार वाढले. यावर मार्ग काढण्याऐवजी सरकार राजकारण करण्यात व्यस्त आहे. अपयश लपवण्यासाठी आता कुणबी, तेली सारखे मुद्दे उपस्थित केल्या जात आहे. पण राज्यातील जनता सुज्ञ आहे. लोकसभेत त्यांनी महायुतीला त्यांची जागा दाखवून दिली. येत्या विधानसभेत देखील महायुतीला जनता धडा शिकवेल. आमचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना अडीच हजार रुपये महिना देणार, असा दावा वडेट्टीवर यांनी यावेळी केला. पत्रकार परिषदेला खासदार नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, उमेदवार मनोहर पोरेटी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपास्थित होते.

हेही वाचा >>>फडणवीसांच्या मतदारसंघातील प्रतिस्पर्धांचे निम्मे अर्ज बाद

गाय, बैल गाढवांसह माणसेही विकल्या गेली

राज्यात अनेक प्रश्न समोर असताना मधल्या काळात सत्ताबदलासाठी जे राजकारण करण्यात आले, ते यापूर्वी महाराष्ट्राने कधीच बघितले नव्हते. आजपर्यंत गाय,बैल, गाढव खरेदी विक्री केली जात होती. पण भाजपने माणसांची खरेदी विक्री केली. हे दुर्दैवी आहे. केवळ कंत्राटदारांच्या नफ्यासाठी राज्यात ७ लाख कोटींचे कंत्राट ४० टक्क्याने वाढवून देण्यात आले. सरकारमध्ये बसलेले लुटारुंची टोळी आहे. असा गंभीर आरोपही वडेट्टीवार यांनी केला.

नाराजांची समजूत काढणार

विधानसभा निवडणुकांसाठी गडचिरोली जिल्ह्यातील यादी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमधील अनेक इच्छुकांच्या हिरमोड झाला आहे. त्यामुळे काहींनी बंडाचा पवित्रा घेत अपक्ष लढण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण आहे. याविषयी वडेट्टीवार यांनी नाराजांची समजूत काढण्यात येईल, असे स्पष्ट केले.