नागपूर : महायुती सरकार मधील नाराजी नाट्य संपत नसल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असून आपल्या गावी गेले आहेत. शिंदे यांची गरज भाजपसाठी संपली आहे का? उध्दव ठाकरे यांचा पक्ष फोडून एकनाथ शिंदेंना आणले तसे शिंदे गटात नवीन ‘ उदय ‘ पुढे येईल असे सूचक विधान काँग्रेस ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. पालकमंत्री पदावरून शिवसेनेत नाराजी आहे अश्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे पदरात काही पडून घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
नागपूर इथे पत्रकारांशी संवाद साधत असताना विजय वडेट्टीवार म्हणाले की विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळून देखील या सरकारमध्ये धुसफुस सुरूच आहे. आधी मंत्रिमंडळ विस्तार, त्यानंतर पालकमंत्री नेमण्यात आणि आता नेमलेले पालकमंत्री या आदेशाला २४ तासात स्थगिती देण्याची वेळ आली यावरून या सरकार मध्ये सगळ काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. आज पालकमंत्री बदलतील, उद्या मंत्री, उपमुख्यमंत्री बदलतील..ही परिस्थिती पाहून जनतेलाच या सरकारला स्थगिती द्यावी लागेल अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. या तिन्ही पक्षांमध्ये जिल्ह्याच्या विकासापेक्षा जिल्ह्यात मलिदा कोण खाणार याची स्पर्धा लागली आहे, यातूनच नाराजी समोर येत आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी देणार, लाडक्या बहिणीचे लाभार्थी कमी केले जात आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार याकडे सरकारचे लक्ष नाही, फक्त एकमेकांत वाद घालून महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचे काम सरकार करत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.
हेही वाचा…सोने- चांदीच्या दरात मोठे बदल… नववर्षात हे आहेत दर…
दरम्यान आज गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली प्रीमियर लीग या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला जाणार आहे.त्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कप्तान मोहम्मद अजहरुद्दीन उपस्थित राहणार आहेत. यावर्षी गडचिरोली प्रीमियर लीग स्पर्धेचे आठवे वर्ष आहे.